Guru-disciple's emotional moments, speech of Mike and Waghmare Guruji in the hands of Dhananjay munde | गुरू-शिष्याचा भावुक क्षण, धनंजयच्या हातात माईक अन् वाघमारे गुरुजींचं भाषण
गुरू-शिष्याचा भावुक क्षण, धनंजयच्या हातात माईक अन् वाघमारे गुरुजींचं भाषण

 बीड - विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा एक फोटो परळीकरांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्या फोटोत, परळी नगरीचे भूषण व मराठी साहित्यात ज्यांचं आदरानं नाव घेतले जातं ते आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या भाषणावेळी धनंजय मुडेंनी चक्क त्यांचं भाषण सुरू असताना माईक हातात पकडल्याचं दिसत आहेत. आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या 'अमृत महोत्सवी वर्षा'निमित्त आयोजित कार्यक्रमातील हा फोटो आहे. 

परळीत रविवारी 10 फेब्रुवारी रोजी गुरुजींचा 'गौरव सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रत्यक्ष हजेरी लावली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे सायंकाळी 6 वाजता हा गौरवसोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंसह धनंजय मुडेंनीही भाषण केलं. मात्र, भाषणानंतर पंकजा मुंडे लगेच निघून गेल्या, तर धनंजय मुंडे गुरुजींचं भाषण होईपर्यंत तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे गुरूजींच्या भाषणावेळी धनंजय मुंडेंनी चक्क स्वत:च्या हातात माईक धरला. गुरुजी बोलत होते आणि धनंजय मुंडेंच्या हातातील माईकमुळे तो आवाज समोर उपस्थित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होता. मुडेंच्या या कृतींची अनेकांनी वाहवा केल्याचंही पाहायला मिळालं.

मी जरी गुरुजींचा विद्यार्थी नसलो, तर महाराष्ट्रात फिरत असताना, गुरुजींचे विद्यार्थी मला नेहमीच भेटतात. त्यावेळी, एक परळीकर म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो. गुरुजींचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्य करतात. मी गुरुजींचा शाळेतील विद्यार्थी जरी नसलो, तरी त्यांच्या विचारांची पूजा करणारा या परळीतचा मुलगा आहे. त्यामुळे मीही गुरुजींचा विद्यार्थी असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं. त्यावेळी परळीकरांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाला दाद दिली. दरम्यान, या सोहळ्याला ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक फ.म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 

कोण आहेत आबासाहेब वाघमारे गुरूजी 
परळी शहरातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून साहित्य क्षेत्रात आबासाहेब वाघमारे यांची ओळख आहे. आबासाहेब वाघमारे यांचे साहित्य क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. मराठी साहित्यात त्यांच्या समृद्ध साहित्याने मोठी भर घातली आहे. कथासंग्रह, काव्यसंग्रह, प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम पुस्तिका, कथा, दीर्घकथा, नाटिका, हस्तपुस्तिका,आदी  मराठीसह उर्दू भाषेतही प्रकाशित आहेत. विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब वाघमारे यांनी जीवनभर अविरत काम केले आहे. प्रति साने गुरुजी अशीच जणू त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी व विविध माध्यमातून सक्रिय काम करून एक उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक अशी त्यांची प्रतिमा आहे. नवोदित साहित्यिकांचे एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांनी काम केले आहे. आकाशवाणी, प्रौढ शिक्षण,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बाल वाचक लेखक मेळावा, परिसंवाद, नवथर  साहित्य मंडळ , नाट्य चळवळ, वाचन चळवळ, अनिसं चळवळ  आदी माध्यमातूनही त्यांनी साहित्यिक व वैज्ञानिक  अभिरुची निर्माण करण्याचे काम सक्रियपणे केलेले आहे. सदोदित प्रेमळ, कार्यप्रेरक, प्रेरणास्त्रोत व निस्पृह साहित्यिक अशा विविध पैलूंनी नटलेल्या बाबासाहेब वाघमारे यांचे हे व्यक्तिमत्त्व परळीकरांसाठी भूषण आहेत. या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वासाठी त्यांच्या जीवनातील हजारो सहकारी, विद्यार्थ्यांनी सोहळ्याचे साक्षीदार होऊन स्वतः धन्य झाल्याचे म्हटले. 


धनंजय मुंडेंचे वाघमारे गुरुजींच्या सन्मानार्थ शब्द 
परळीचे गुरुवर्य, बाल साहित्यिक आबासाहेब वाघमारे गुरुजींचा अमृत महोत्सव सोहळा रविवारी परळीत संपन्न झाला. गुरुजींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. वाघमारे गुरुजी हे मूल्यसंस्काराचे विद्यापीठ आहे. परळीचे साने गुरुजी आहेत. आर. के. लक्ष्मण यांचे कॉमन मॅन आहेत. त्यांच्या हातून एक संवेदनशील पिढी निर्माण झाली.

कार्यक्रमादरम्यान गुरूजींचा गौरव ग्रंथ 'सृजनामृत', पुस्तक 'रुजवण' या मूल्य विचार संग्रहाचे प्रकाशन केले. मला अत्यंत आनंद होतोय की, गुरुजींची सर्व ग्रंथसंपदा आता 'ब्लॉग'वर उपलब्ध होणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रवाह असाच वाहत राहणार आहे.

सर्व मान्यवरांनी वाघमारे गुरुजींच्या कार्याची दखल घेतली. वैद्यनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुजींची शिकवण, त्यांची शिस्त अशा विविध आठवणी सांगितल्या. परदेशात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने व्हिडोओद्वारे सरांविषयी आपले मनोगत मांडले. या नेत्रदीपक सोहळ्यास सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रा. फ. म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे मंचावर उपस्थित होते. हा गौरव सोहळा साहित्यिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या सर्व रसिकांना एक आगळीवेगळी पर्वणी ठरला.


Web Title: Guru-disciple's emotional moments, speech of Mike and Waghmare Guruji in the hands of Dhananjay munde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.