Gambling moves police; After eight years | जुगाऱ्याने पोलिसांना घुमविले; आठ वर्षानंतर प्रकार चव्हाट्यावर
जुगाऱ्याने पोलिसांना घुमविले; आठ वर्षानंतर प्रकार चव्हाट्यावर

ठळक मुद्देफसवणुकीचा गुन्हा दाखल : हद्दपार असतानाही खुलेआम वावर

बीड : माजलगाव शहरात जुगार चालविणाऱ्याने चक्क पोलिसांनाच घुमविल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला आहे. खोटे नाव सांगून आठ वर्षांपासून तो शहरात वावरत आहे. हद्दपार असतानाही शहरात वावरताना आढळल्याने विशेष पथकाने कारवाई केली. चौकशी केल्यानंतर हा खोटा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आठ वर्षांपासून आरोपी खोटे नाव सांगत असतानाही माजलगाव पोलिसांना याचा थांगपत्ता नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मधुसुदन प्रभाकर डोळ (४८ रा.माजलगाव) असे त्या फसवणूक करणा-या आरोपीचे नाव आहे. मधुसूदनने संजय नावाचे खोटे मतदान कार्ड तयार करून घेतले. तो जुगारी गुन्हे करण्याच्या वृत्तीचा आहे. २००८ साली त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला. तेव्हाही त्याने आपण संजय प्रभाकर डोळ असे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर २०१५ पर्यंत विविध असे ७ गुन्हे दाखल झाले.
गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याची पार्श्वभूमी तपासून त्याला २ फेब्रुवारी २०१७ साली बीड जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. मे महिन्यात हा आदेश डोळ याला तामील करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळीही त्याचे नाव संजय असेच होते. मधुसूदनचा उल्लेख कोठेही नव्हता.
दरम्यान, हद्दपार असतानाही डोळ हा माजलगाव शहरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृृष्ण सागडे यांनी मंगळवारी शहरात सापळा लावला. गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे यांनी त्याला दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी त्याने आपण संजय नसून मधुसुदन असल्याचे सांगितले.
संजय हा कोल्हापूरला असल्याचे सांगितले. सागडे यांनी विश्वासात घेऊन उलट तपासणी केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून शहर पोलिसांना दिला.
त्यावरून पोउपनि रमेश जाधवर यांच्या फिर्यादीवरून डोळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोनि सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बिराजदार हे तपास करीत आहेत.
आता जामीनदारही संशयाच्या भोव-यात
सात गुन्हे दाखल असलेल्या मधुसूदनचा जामीन घेण्यासाठी अनेक लोक आले. त्यांनी हा संजयच असल्याचे सांगून जामीन घेतला. आता खरा प्रकार चव्हाट्यावर आल्याने ते सुद्धा संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. या आरोपीने न्यायालयाचीही दिशाभूल केली आहे.
पोलिसांनी उलट तपासणी का केली नाही?
मधुसूदन हा नाव बदलून गुन्हे करीत असताना माजलगाव पोलिसांनी त्याची एकदाही उलट तपासणी केली नाही. तब्बल सात गुन्हे आणि आठ वर्षाच्या कालावधीत त्यांना हा प्रकार न समजल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष पथकाच्या कारवाईनंतर खरा प्रकार समोर आल्याने माजलगाव पोलीसही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.


Web Title: Gambling moves police; After eight years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.