ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशानुसार चार लाखांचा गुटखा नष्ट पाच महिन्यात ९ ठिकाणी धाडी टाकून १४ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.


बीड : शहरात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पाच महिन्यात ९ ठिकाणी धाडी टाकून १४ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन टप-या व वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. मागील काही वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

काही महिन्यांपासून बीडमध्ये अवैध गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सहायक आयुक्त अभिमन्यु केरूरे, अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर यांनी पाच महिन्यात ९ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये १४ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या वापरासाठी वापरलेल्या दोन टप-या, एक राहती जागा व ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ९ पैकी ४ प्रकरणातील गुटखा सबंधीत कार्यक्षेत्राच्या  न्यायालयातुन मिळालेल्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सदर वाहन किंवा जागा पुन्हा अशा अवैध कारणांसाठी वापरली जाणार नाही, या अटींवरच परत करण्यात आली. तसे लेखी घेतले असून उर्वरित पाच प्रकरणांवर कारवाई सुरू असल्याचे जाधवर यांनी सांगितले.

कलम ११० नुसार कारवाई 
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर ज्या आरोपींवर वा आस्थापनांवर गुटखा विक्र ी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी कोणीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा आढळून आल्यास त्याच्या विरोधात (रिपीटेड आॅफैंडर म्हणून) सी. आर. पी. सी. च्या कलम ११० नुसार कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्राच्या कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करण्यात येणार आहे.
- अभिमन्यू केरूरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

माहिती मिळताच त्वरित छापे 
जिल्ह्यात गुटखाबंदी व्हावी यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. तरीही काही ठिकाणी गुटख्याचा साठा करुन ठेवला जातो. माहिती मिळताच आम्ही त्वरीत छापे टाकून कडक कारवाई करतो. अनेक वेळा अडचणी आल्या मात्र वरिष्ठांच्या पाठबळामुळे त्यावर यशस्वी मात केली. यापुढे कोठेही गुटखा विक्री होणार नाही यासाठी आमच्याकडून नियोजन सुरु आहे.
- सुलोचना जाधवर, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन