Drought In Marathwada : पेर, नाही, पाणी नाही, खायचं काय? प्यायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 08:10 PM2018-11-16T20:10:59+5:302018-11-16T20:12:46+5:30

 दुष्काळवाडा :  पुढचे आठ महिने किती होरपळीचे राहणार असल्याची व्यथा बीड तालुक्यातील पेंडगाव येथील ग्रामस्थ मांडत होते. 

Drought in Marathwada: No sowing, no water, what about eating? What to drink ? | Drought In Marathwada : पेर, नाही, पाणी नाही, खायचं काय? प्यायचं काय?

Drought In Marathwada : पेर, नाही, पाणी नाही, खायचं काय? प्यायचं काय?

Next

- अनिल भंडारी, पेंडगाव, ता. जि. बीड

बीड :  यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने खरिपाच्या पिकांची वाट लागली आहे. ओल नसल्याने रबीचाही पेरा झाला नाही. माणसासाठी पिण्याच्या पाऱ्याबरोबरच जनावरांच्या चारा- पाण्याचे हाल सुरु झाले आहेत. खायचं काय? पशुधन कसं जगवायचं? पुढचे आठ महिने किती होरपळीचे राहणार असल्याची व्यथा बीड तालुक्यातील पेंडगाव येथील ग्रामस्थ मांडत होते. 

बीड शहरापासून १० किलोमीटर अंतरावर धुळे- सोलपूर राष्ट्रीय महामार्गावर संकटमोचन हनुमान मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या पेंडगाव येथील दुष्काळी स्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला. जवळपास ३०० उंबऱ्याचे गाव असलेल्या पेंडगावात हनुमान मंदिराजवळ असलेल्या हातपंपावर महिला पाणी भरत होत्या. गावात सध्या या एकमेव हातपंपाला पाणी आहे. गावापासून ३ किलोमीटर अंतरावर सिंदफना तर अर्ध्या किलोमीटरवर दुसरी एक नदी आहे. गावाजवळच कुमस ओढा आहे. तेथे जलयुक्तमधून बंधारा घेतला आहे. मात्र यंदा पाऊस नसल्याने ही सर्वच ठिकाणे कोरडी आहेत. 

गावात सहा हातपंप असून एकच सुरु आहे. ४० पैकी ४० विहिरी असून सर्वच विहिरींची  पाणीपातळी खोलवर गेली आहे. ज्यांच्याकडे शेतात बोअर आहेत त्यांनी स्वत:साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तर इतरांना ३०० रुपयात एक हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. 
गावातील ८० टक्के जमीन सुपीक आहे. शेणखत वापरुन ती जगविली. पण यंदा काळ्याआईची तहान भागली नाही. त्यामुळे गाव परिसरातील ४० हेक्टर परिसरातील  ऊस वाळून गेला आहे. पावसाअभावी चारा पिकविता आला नाही. ३०० रुपये शेकडा उसाचे वाढे आणून पशुधनाची भूक भागविली जात असलीतरी  पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने गाव आणि परिसरातील जवळपास एक हजार पशुधन जगवायचे कसे याची चिंंता नोव्हेंबरपासूनच लागली आहे. 

गावात फेरफटका मारताना ८९ वर्षांचे दगडू पाटील  मंकाजी धट भेटले. ते म्हणाले, १९७२ मध्ये पाणी भरपूर होते, पण पेर नव्हती झाली. यावेळी तर भयंकर परिस्थिती आहे. पेरही नाही आणि पाणीदेखील नाही. खरिप, रबी दोन्हीला झपका बसला आहे. या दुष्काळामुळे पाच वर्ष मागे जावं लागणार आहे.  त्यांच्यासोबतचे निवृत्ती बाबू जाधव म्हणाले, साहेब मोठ्या आशेने कपाशी लावली, पण बोंडाला वातीऐवढाही कापूस आला नाही. खरीप, रबी हंगाम वाया गेलेल्या पेंडगावात ३० हेक्टर क्षेत्रात फळबागा आहेत. पपई, मोसंबी, चिकूच्या या बागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. महामार्गाच्या कामामुळे या भागात काहीशी वर्दळ दिसत असलीतरी आगामी नऊ महिने भयंकर संकटाचे जाणार असल्याचे चित्र पहायला मिळाले. 


कापूस जळाला, मका करपली
१५ एकर क्षेत्रापैकी ५ एकरात ऊस, ८ एकरात कापूस आणि २ एकरात जनावरांसाठी मक्याचे पीक घेतले. ऊस जळून गेला, मका करपली, बोंडअळी व पिठ्ठया ढेकूणच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. २५- ३० पशुधन आहे. ती जगवायची कशी हाच प्रश्न आहे. --- धनराज गुरखुदे, शेतकरी, पेंडगाव.

पाण्याची अडचण
हातपंपावर पाणी भरण्यासाठी आलेल्या क्वानताबाई धट म्हणाल्या,  कधी- कधी सडकेच्या पलिकडून (महामार्ग) पाणी आणावे लागते. तिथं वाहनांची रांग लागली की दोन तास थांबावे लागते. घरी चार म्हशी आहेत. ८-१० माणसं आहेत. रोज अडीचशे लिटर पाणी लागते, नाही भरून चालणार कसं, असे त्या म्हणाल्या. हातपंपावर रात्री बारा वाजेपर्यंत लोक पाणी भरतात. काही दिवसच हा पंप चालेल, असे अब्दुलभाई म्हणाले.  

बंधाऱ्यांचा गाळ नेण्यास हरकत नको
कुमस ओढ्यावरील बंधाऱ्याच्या वर ५०० मीटर अंतरावर दोन बंधारे मंजूर आहेत. या बंधाऱ्यांचे काम होणे महत्वाचे आहे. तर आहे त्या दोन बंधाऱ्यातील गाळ नेण्यासाठी मुभा द्यावी. शासनाने हरकत घेऊ नये, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  

पाणी पुरवठा लाईन उद्ध्वस्त
पेंडगावपासून ३- ४ किलोमीटर अंतरावरील नांदुर येथून पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन होती. अडीच किलोमीटरपर्यंतची पाईपलाईन महामार्गाच्या कामात उद्ध्वस्त झाली. दोन वर्षांपासून हे काम रखडलेले आहे.  ग्रामस्थांनी निवेदने, अर्ज दिले, तक्रारी केल्या. आयआरबीने अद्याप मनावर घेतलेले नसल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे. 

पेंडगावचे भौगोलिक क्षेत्र  : ४२७.८२ हेक्टर
लागवडयोग्य क्षेत्र  : ३८०.२८ हेक्टर
खरीप लागवड : ३७३ हेक्टर
रबी लागवड : दोन- चार ठिंकाणी ज्वारी उगवलीच नाही

पेंडगाव : पाऊसप्रमाण (मागील पाच वर्षातील)
२०१८- १५५ मि. मी. 
२०१७- २०० मि. मी. 
२०१६- ३२० मि. मी. 
२०१५- १७५ मि. मी. 
२०१४- १८० मि. मी. 


टॅँकरचा प्रस्ताव दिला 
पेंडगाव येथील पाणी टंचाईमुळे १२ हजार लिटरच्या तीन खेपांसाठी टॅँकरचा प्रस्ताव आहे. नांदुर येथी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्याबाबत पंचानाम्यात उल्लेख केला आहे. बोंडअळीने या भागातील कपाशीचे मोठे नुकसान झालेले आहे. पीक विम्याची रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. -- एम. बी. मसवले, तलाठी, पेंडगाव.

मजुरीची वेळ
पेंडगाव येथील १५ कुटुंब दरवर्षी ऊस तोडणीसाठी जातात. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ४० कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. काही जण जवळच्या इतर कारखान्यावर तर किमान २०० लोक बीडमध्ये मजुरीसाठी जातात. 

बीड तालुक्यात पाऊसप्रमाण कमीच
बीड तालुक्यात ११ महसूल मंडळे आहेत.  यंदा जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत बीड मंडळात ३१२ मिमी, राजुरी १३८, मांजरसुंबा ४०६, चौसाळा ३२०, नेकनूर ४८३, नाळवंडी १५७, पिंपळनेर २६३, पाली ३४१, म्हाळस जवळा २३८, लिंबागणेश ३८६ तर  पेंडगाव महसूल मंडळात १५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पेंडगाव परिसरात एकूण ९०० एकर क्षेत्र आहे. त्यापैकी बागायती २०० एकर आणि ७०० एकर जिरायती क्षेत्र आहे. 


बळीराजा काय म्हणतो ?
चाऱ्याचा पेराच नाही
 ५ एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याने ४ एकरात कापूस व एका एकरात बाजरी लावली. बाजरीतून २०० ते २५० सरमाड मिळाले. ते जनावरांना ८ ते १० दिवसच पुरले. आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये कडुळ, मका पेरले जाते. यंदा पाण्याअभावी पेरणीच झाली नाही.- विश्वंभर पाटीलबुवा गाडे, शेतकरी. 

विहिरींचे खोलीकरण करा
पेंडगावच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावातील शासकीय विहिरींचे ३० फुटांपर्यंत खोलीकरण गरजेचे आहे. मजुरांना कामे उपलब्ध करुन रोजगाराची व्यवस्था करावी. पशुधनासाठी तत्काळ चारा छावणी सुरु करावी. दुष्काळी उपाययोजनांसाठी शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलेले आहे. -- कल्याण महादेव गाडे, सरपंच, पेंडगाव. 

७२ पेक्षा भयानक
यावेळी १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ जाणवतोय. असे यापूर्वी पाहिले नव्हते. सर्वे नंबर ८१ मधील विहिर आॅगस्टपासून पहिल्यांदाच आटली आहे. यापूर्वी तिचाच आधार असायचा.जनावरांसाठी दावणीला चारा द्यावा, मजुरांना काम द्याव, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. 
- दत्तात्रय रामराव गाडे, शेतकरी, पेंडगाव. 

तुरीचे फुल गळाले, मक्यातही तोटाच
दीड एकरात तूर लावली, पाण्याअभावी जगली नाही. फुले आली अन् गळाली. दीड एकरात मका लावला. त्यासाठी  ४ हजार ५०० रुपये खर्च केला. एकूण उत्पन्न ५२०० रुपये आले, बैलबारदाना व श्रम आमचेच होते. आमच्या गावात प्रयोगशील शेतकरी आहेत. परंतु पाणीच नसल्याने हतबल झाले आहेत. --सुनील रामभाऊ काळकुटे, माजी सरपंच, पेंडगाव

यंदा मोठे नुकसान
मागील वर्षी चार एकरात ४३ क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले होते. यंदाही मी चार एकरात कापूस लावला. ५० हजार रुपये खर्च केला, मात्र सव्वा क्विंटलच उत्पादन झाले. एकूण ४० हजाराचे नुकसान झाले. ऊसही जळून गेला. -- रमेश शहादेव गाडे, शेतकरी, पेंडगाव. 

Web Title: Drought in Marathwada: No sowing, no water, what about eating? What to drink ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.