कामचुकार डॉक्टरांना शिस्तीचे ‘डोस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:37 PM2019-06-06T23:37:37+5:302019-06-06T23:38:01+5:30

बीड : जिल्हा रूग्णालयातील कामचुकार डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला होता. हाच धागा पकडून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक ...

'Dose' to work doctor! | कामचुकार डॉक्टरांना शिस्तीचे ‘डोस’!

कामचुकार डॉक्टरांना शिस्तीचे ‘डोस’!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : आरोग्य उपसंचालकांची चार दिवसात बीड जिल्हा रुग्णालयाला दुसऱ्यांदा भेट; आता सातत्याची गरज

बीड : जिल्हा रूग्णालयातील कामचुकार डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला होता. हाच धागा पकडून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी चार दिवसांत दुसऱ्यांदा अचानक भेट देत कामचुकार डॉक्टरांची हजेरी घेतली. नेत्यासारखे कपडे घालून रूबाब गाजविणारे डॉक्टर आज पहिल्यांदाच गळ्यात स्टेथोस्कोप घालून अ‍ॅप्रनमध्ये दिसले. उपसंचालकांच्या भेटीमुळे आरोग्य प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
मागील काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयाचा कारभार बिघडला होता. बाह्य रूग्ण तपासणी विभागात डॉक्टर बसत नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागत होते. तसेच अंतरूग्ण विभागातही डॉक्टर वेळेवर राऊंड घेत नाहीत. घेतला तर रूग्णांना काळजीपूर्वक न तपासता केवळ कागदी घोडे नाचवित होते. याच तक्रारी वाढल्याने आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना अस्थि व बालरोग विभागात एकही डॉक्टर आढळला नव्हता. त्यांना नोटीस बजावली होती. तसेच इतर अनेक सुचना केल्या होत्या.
एकदा येऊन गेल्यानंतर उपसंचालक पुन्हा येणार नाहीत, असा समज डॉक्टरांमध्ये होता. त्यामुळे ते पुन्हा कामचुकारपणा करू लागले. मात्र गुरूवारी अचानक सकाळी ९ वाजताच डॉ.माले रूग्णालयात आले आणि सर्वांची हजेरी घेतली. रूग्णांशी संवाद साधत असतानाच कामचुकार डॉक्टरांमध्ये फोनाफोनी झाली आणि सर्वजण राऊंडच्या वेळेत गळ्यात स्टेथोस्कोप आणि अंगात अ‍ॅप्रन घालून तयार होते. रूग्णांना अरेरावी करणारे डॉक्टरही गुरूवारी आपुलकीने उपचार करताना दिसून आले. यात असेच सातत्य ठेवावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
यावेळी बीडचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही. शिंदे, मेट्रन मंदा खैरमोडे, परिसेविका संगिता सिरसाट आदी त्यांच्यासमवेत होते.
दरम्यान, हा दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा देण्यासाठी वरिष्ठांनी कामचुकार डॉक्टरांचे कान टोचून चांगले काम करणाºयांचे स्वागत करणे गरजेचे आहे.

Web Title: 'Dose' to work doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.