चारा छावण्यांची देयके मिळण्यास होणार विलंब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:16 AM2019-05-13T00:16:50+5:302019-05-13T00:17:22+5:30

चारा छावणीची देयके मिळण्यास विलंब होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे सेवाभाव वृत्तीमधून सुरु केलेल्या इतर सर्वसामान्य चालकांना छावणी चालवणे जिकिरीचे झाले आहे.

Delay to get payment of fodder camps? | चारा छावण्यांची देयके मिळण्यास होणार विलंब ?

चारा छावण्यांची देयके मिळण्यास होणार विलंब ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ६०० चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. यापैकी काही चारा छावणी चालकांनी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन भ्रष्टाचार करण्यासाठी जनावरांची संख्या जास्त दाखवली होती. मात्र, जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार काही छावण्यांची तपासणी केली असता हा गैरप्रकर उघड झाला होता. या कारणामुळे चारा छावणीची देयके मिळण्यास विलंब होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे सेवाभाव वृत्तीमधून सुरु केलेल्या इतर सर्वसामान्य चालकांना छावणी चालवणे जिकिरीचे झाले आहे.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. काही छावणी चालकांनी शासकीय छावण्या सुरु होण्यापूर्वीच स्वखर्चाने चारा छावणी सुरु केल्या. जिल्ह्यात चारा शिल्लक नसल्यामुळे परजिल्ह्यातून तसेच राज्यातून चारा आणावा लागत आहे. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक २० दिवसांनी चारा छावण्याची देयके मिळण्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. शासनाकडून १०३ कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान चारा छावण्यांची देयके देण्यासाठी जिल्हा प्रशासनास प्रप्त झाले आहे. अनुदान प्राप्त होऊन ५ दिवस उलटत आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्याचे छावणीचे अहवाल मागवण्याचे काम सुरु आहे. मात्र, अचानक केलेल्या छावणी तपासणीमध्ये जनावरांच्या आकडेवाडीत तफावत आढळून आल्यामुळे देयके मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर सर्वच चारा छावण्याच्या अहवालांची देखील तपासणी केली जाणार आहे. तसेच सरसकट देयके अदा न करता योग्य पडताळणी करुनच छावणीची देयके दिली जाणार आहेत. त्यामुळे काही जणांच्या चुकीचा फटका इतर सर्वसामान्य छावणी चालकांना बसत असल्याचे चित्र आहे.
चारा छावण्यांवर अधिक जनावरे दाखवणा-या छावणी चालकांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी. परंतु, नियमांचे पालन करुन छावणी चालवत आहेत त्यांची देयके तात्काळ देण्यात यावी अन्यथा चारा छावणी बंद करण्याशिवाय पर्याय नाही.
- बळीराम गवते
चारा छावणी चालक

Web Title: Delay to get payment of fodder camps?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.