भाजप पदाधिकाऱ्याची बँक व्यवस्थापकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:19 AM2019-02-14T00:19:05+5:302019-02-14T00:19:44+5:30

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज फाईल मंजूर करण्याच्या कारणावरुन भाजप पदाधिका-याने एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकास बेदम मारहाण केली.

BJP officials beat up bank manager | भाजप पदाधिकाऱ्याची बँक व्यवस्थापकाला मारहाण

भाजप पदाधिकाऱ्याची बँक व्यवस्थापकाला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देचौसाळ्यातील प्रकार : कर्जफाईल मंजूर करीत नसल्याचे कारण

बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज फाईल मंजूर करण्याच्या कारणावरुन भाजप पदाधिका-याने एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. ही घटना बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाळासाहेब आत्माराम मोरे (रा.अंजनवती ता.बीड) व बाळू विश्वनाथ बन (रा.घारगाव ता.बीड) यांचा आरोपींत समावेश असून मोरे हे भाजप किसान सेलचे बीड तालुकाध्यक्ष आहेत. बाळू बन यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत चौसाळा येथील एसबीआय शाखेत कर्जासाठी फाईल दाखल केली होती. शाखा व्यवस्थापक महेश चौधरी यांनी ही फाईल वरिष्ठांकडे पाठविली. मात्र सिबिलनुसार बन यांच्याकडे यापूर्वीचे कर्ज आहे. शिवाय त्यांच्या फाईलमध्ये अनेक त्रुटी असल्याने ही फाईल परत पाठविली. याबाबत बन यांना कळविण्यात आले. त्यानंतर बन हे बाळासाहेब मोरे यांना बँकेत घेऊन आले. दाखल केलेली फाईल मंजूर का करीत नाहीस, असे म्हणत व्यवस्थापक चौधरी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सर्वांसमोर बेदम मारहाण केली. यामध्ये चौधरी यांच्या हाताला आणि डोळ्याला जखम झाली. बँकेतील इतर कर्मचारी आणि ग्राहकांनी सोडवासोडव केली आणि चौधरी यांना चौसाळा येथील रूग्णालयात दाखल केले. तोपर्यंत बन व मोरे बँकेतून निघून गेले. या प्रकरणाची चौधरी यांनी फोनवरून नेकनूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ टिम पाठविली. त्यानंतर चौधरी यांनी नेकनूर ठाण्यात मोरे व बन विरोधात रितसर फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आज बॅँकर्स जिल्हाधिकाºयांना भेटणार
दरम्यान बुधवारी घडलेल्या या प्रकाराने बॅँक अदिकारी व कर्मचारी भयभीत झाले असून गुरुवारी यासंदर्भात व सुरक्षेबाबत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना बॅँकर्स समितीचे अधिकारी भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
आठवडभरापूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी बीडसह काही तालुक्यांमध्ये आढावा बैठका घेतल्या. त्यावेळी बँकेतील पत सांभाळण्याचे व रितसर कर्जफेड करण्याचे आवाहन केले होते. तसेच यापूर्वी इतर कोणते कर्ज घेतले असल्यास ते फेडल्याशिवाय हे मिळणार नाही असे सांगितले होते. मात्र, चौसाळ्याच्या घटनेने बँक अधिकाºयांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

Web Title: BJP officials beat up bank manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.