बीडच्या तुरुंगातून पलायनाचा प्रयत्न; दोघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:38 AM2018-03-16T00:38:20+5:302018-03-16T00:38:29+5:30

सुरक्षा रक्षक झोपेत असल्याचा फायदा घेत दोन कैद्यांनी कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याने भिंतीवरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला तर दुसरा कैदी त्याला पाहून कारागृहात परतला. हा प्रकार गुरूवारी पहाटे येथील जिल्हा कारागृहात घडला. दरम्यान, जखमी झालेला कैदी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता. नागरिकांनी त्याला सर्वसामान्य आहे, असे समजून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Attempt to escape from Beed's prison; Both suspended | बीडच्या तुरुंगातून पलायनाचा प्रयत्न; दोघे निलंबित

बीडच्या तुरुंगातून पलायनाचा प्रयत्न; दोघे निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देबेशुद्ध कैद्यास नागरिकांनी केले रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सुरक्षा रक्षक झोपेत असल्याचा फायदा घेत दोन कैद्यांनी कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याने भिंतीवरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला तर दुसरा कैदी त्याला पाहून कारागृहात परतला. हा प्रकार गुरूवारी पहाटे येथील जिल्हा कारागृहात घडला. दरम्यान, जखमी झालेला कैदी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता. नागरिकांनी त्याला सर्वसामान्य आहे, असे समजून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. या घटनेने कारागृहातील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. ज्ञानेश्वर बालाजी जाधव (३०, रा.रेणापूर जि.लातूर) व विकास मदन देवकते अशी पलायन करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत. गुरूवारी पहाटे स्वयंपाक बनविण्यासाठी कैद्यांना बाहेर काढले होते. कैद्यांसह मुख्य प्रवेशद्वारावर गाढ झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून ते भिंतीवर चढले. पहिल्यांदा ज्ञानेश्वर याने भिंतीवरून खाली उडी मारली आणि तो गंभीर जखमी झाला.

तो पडल्याचे पाहून विकास परतला. तर जखमी झालेला ज्ञानेश्वर जखमी अवस्थेत नगर रोडवरील प्रवेशद्वाराजवळ आला. साध्या कपड्यात असलेला ज्ञानेश्वर बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहून काही नागरिकांनी त्याला रिक्षातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथील पोलिसांनी त्याला ओळखल्यानंतर कारागृह प्रशासनाला माहिती दिली. जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या. रूग्णालयात त्याच्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ज्ञानेश्वर कुख्यात दरोडेखोर
ज्ञानेश्वर जाधव हा कुख्यात दरोडेखोर आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यात त्याने दहशत निर्माण केली होती. अंबाजोगाई तालुक्यातील एका दरोड्यात तो जिल्हा कारागृहात बंदीस्त होता. तर विकास हा बलात्काराच्या आरोपात कारागृहात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून, सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

दोन दिवसांपासून होता कट
कारागृहात आल्यावरच विकास व ज्ञानेश्वरची ओळख झाली. याचाच फायदा त्यांनी पलायनासाठी केला. दोन दिवसांपासून त्यांनी बॅरेकमध्ये पलायन करण्याची प्लॅन आखला. त्याप्रमाणे गुरूवारी पहाटे संधी साधून त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला. यात ज्ञानेश्वर यशस्वी झाला तर विकास अपयशी ठरला होता.

खिडकीवरून चढले भिंतीवर
हे दोन्ही कैदी सुरक्षा भिंतीला असलेल्या एका खिडकीच्या सहाय्याने संरक्षक भिंतीवर चढले. मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंती १८ फुट आहे तर सुरक्षा भिंत ४० फुटांची आहे.
आगोदर प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर चढून नंतर ते सुरक्षा भिंतीवर गेले आणि तेथून ज्ञानेश्वरने खाली उडी मारली तर विकास परतला. यामध्ये ज्ञानेश्वर जखमी झाल्याने रक्त पडले होते.
याच रक्ताधारे कारागृह पोलीस रूग्णालयात पोहचले असता ज्ञानेश्वर उपचार घेताना दिसला.

दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित
घटनेची माहिती मिळताच कारागृह उप महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. तसेच चौकशी करून जबाबदार असलेल्या प्रकाश शामराव मस्के व रमेश वामनराव हंडे या दोन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबीत केले. तसेच सुरक्षेबाबत कारागृह प्रशासनाला सुचना करण्यात आल्या आहेत.

कारागृह प्रशासनाची धावपळ
स्वयंपाक झाल्यानंतर कैद्यांना बॅरेकमध्ये नेताना एक जण कमी दिसला. सीसीटीव्ही तपासले असता ज्ञानेश्वरने पालयन केल्याचे दिसले तर विकास परतल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर कारागृह प्रशासनाची धावपळ सुरू झाली. जिल्हा रूग्णालय, बसस्थानक व इतरत्र ज्ञानेश्वरला शोधण्यासाठी पोलीस धावाधाव करीत होते.
पाणी आणण्यास दोघे विहिरीवर गेले होते. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. एक परतला तर दुसºयाने पलायन केले. दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. चौकशी करून जबाबदार दोन्ही असलेल्या दोन कर्मचा-यांना निलंबीत केले आहे.
- एम.एस.पवार
कारागृह अधीक्षक, बीड

Web Title: Attempt to escape from Beed's prison; Both suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.