नागपूर -   राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूवर मात करत विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत सायनाने सिंधूवर 21-17, 27-25 अशी मात केली. सायनाचे या स्पर्धेतील हे तिसरे विजेतेपद आहे.  
सायना नेहवाल  आणि पी.व्ही. सिंधू यांच्यातील अंतिम लढत रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने पहिल्या गेममध्ये प्रत्येक पॉइंटसाठी चुरस दिसून आली. सायनाने सुरुवातीला घेतलेला आघाडी कमी करत सिंधूने गेममध्ये 17-18 अशी मजल मारली होती. पण सायनाने शेवटचे तीन पॉईंट जिंकत पहिला गेम 21-17 ने खिशात टाकला.
पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ करून सायनावर हुकूमत राखली. पण उत्तरार्धात सायनाने जोरदार मुसंडी मारत 18-19 अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने पुन्हा खेळ उंचावत लढतीत 22-22 अशी बरोबरी साधली. मात्र सायनाने आपला अनुभव पणाला लावत हा गेम 27-25 अशा फरकाने जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला. 
तत्पूर्वी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत प्रणॉयने अटीतटीच्या लढतीत श्रीकांतवर 21-15, 16-21, 21-7 अशी मात केली. काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रणॉयने महाराष्ट्राचा खेळाडू शुभांकर डे याचा २१-१४, २१-१७ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुस-या उपांत्य सामन्यात अनुभवी श्रीकांतने उत्तराखंडच्या लक्ष्य सेन याची  झुंज मोडून काढत २१-१६, २१-१८ने बाजी मारली होती.   मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात अनुभवी सायनाने गोव्याची अनुरा प्रभुदेसाई हिच्यावर २१-११, २१-१० ने ३० मिनिटात विजय साजरा केला होता. दुस-या उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने तीन गेममध्ये जी. ऋत्विक शिवानीचे आव्हान ५० मिनिटांत १७-२१, २१-१५,२१-११ असे संपुष्टात आणले होते.