कारवर पडलेला ओरखडा घालवण्यासाठी आटापिटा कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:27 PM2017-08-16T13:27:42+5:302017-08-16T13:27:51+5:30

कारच्या रंगाचा भंग करणारा स्क्रॅच काढण्यासाठी अनेकांचा अगदी आटापिटा चालू असतो. पण तो स्क्रॅच काढण्यासाठी खर्च दिसला की मग मात्र मानसिक शांतता भंग पावते...

What is the reason for scratches on the car? | कारवर पडलेला ओरखडा घालवण्यासाठी आटापिटा कशासाठी ?

कारवर पडलेला ओरखडा घालवण्यासाठी आटापिटा कशासाठी ?

आपली कार अगदी जीवापाड जपणारेही अनेक हौशी असतात. हौशी अशासाठी म्हणतो, की काहीवेळा अगदी छोटासा ओरखडाही कारच्या रंगावर दिसून आला की, अशा हौशींची घालमेल खूप होते. आता काय करावे की ज्यामुळे ओरखडा जाईल. वास्तविक छोटा ओरखडा किंवा ज्याला इंग्रजीमध्ये scratch  असे म्हणतो, त्यामुळे तुमच्या कारचे वा स्कूटरचे खरोखरच सौंदर्य नष्ट झालेले आहे का, हा विचार करा, साधारणपणे असे ओरखडे काढण्यासाठी गॅरेजमध्ये त्याची किंमत करायला गेलो तर कमीत कमी २००० रुपये तरी सांगितले जातात. यामुळेच ओरखडा तर दिसतो पण काढायचा तर इतके पैसे खर्च करणे नको वाटते. यासाठी मग रबिंग सोल्युशनचा वापर करून बारीकसा ओरखडा जेथे आलेला आहे तो भाग त्या ओरखड्याच्याठिकाणी रबिंग सोल्युशनद्वारे कापडाच्या सहाय्याने वर्तुळाकार घासत ओरखड्याचा खड्डा रंगाबरोबर समतल करण्याचा प्रयत्न होतो. त्यानंतर पॉलिशचा वापर करून तेथे तो बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा आभास का होईना निर्माण होतो.

खरे सांगायचे तर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात कारवर काही ना काही स्क्रॅच असला तर फार लक्ष दिले जात नाही. छोटाच कशाला मोठा स्क्रॅच वा पत्रा मोठ्या प्रमाणात चेपला गेला असला तरी त्याकडे लक्ष न देणारे अनेक जण असतात. वास्तविक शहरांमधील वाहतुकीचे प्रमाण इतके वाढले आहे की, त्यामुळे कितीहीवेळा स्क्रॅच वा चेपला गेलेला पत्रा डेंटिंग- पेंटिंग करून नीट केला तरी पुन्हा त्या प्रकारचा स्क्रॅच वा नुकसान होण्यासाठी फार कालावधी जावा लागत नाही. अपघात नव्हे तर लोकांचा असणारा वावर, त्यांच्याकडून मोटारीबाबत केली जाणारी सहज कृती, मोटारीला टेकून उभे राहाणे व पादत्राण मोटारीच्या पत्र्यावर टेकवणे, लहान मुलांकडून कारच्या रंगावर चाव्या, वा कठीण वस्तूने ओढल्या जाणाऱ्या रेषा, कुत्र्यांकडून, मांजरांकडून नखांद्वारे ओरबाडण्याची होणारी कृती,   पार्क केलेल्या मोटारीला सायकल, मोटारसायकल यांचा लागणारा धक्का अशा प्रकारांमुळे कारचा रंग स्क्रॅचद्वारे वा धक्क्यामुळे पत्रा चेपले जाण्याचे प्रकारही घडत असतात. अशा स्थितीत कितीवेळा तुम्ही त्या रंगाची काळजी घ्याल हा ही प्रश्नच असतो. 

साधारणपणे स्क्रॅच कसा आहे, किती खोल आहे, किती मोठा आहे, त्यामुळे पत्र्याच्या अंतर्भागाला वातावरणाच्या प्रभावाने गंज लागण्याची शक्यता आहे का, हे प्रथम पाहून निश्चित करा. त्यानुसार कार खरोखरच गॅरेजला नेण्याची व स्क्रॅच काढण्याची गरज आहे का ते पाहा. अनेकदा छोट्या स्क्रॅचसाठी असा आटापिटा करण्याची गरज नसते. बाजारात मिळणाऱ्या स्क्रॅच रिमुव्हर पेनाचा वापर  करू नका. त्यामधील द्रवामुळे कारचा रंग विरघळून त्या स्क्रॅचमध्ये पसरत असतो, त्यामुळे रंगाचे कॉम्बिनेशनही बदलू शकते. रंगाच्या जवळपास जाणार्या शेडचे स्प्रे मिळतात, पण त्यामुळे तुमच्या कारचा रंग तो त्या शेडबरोबर योग्य आहे की नाही, ते पाहून घेणे कठीण असते. अतिशय छोटा स्क्रॅच नसला तरी त्यामुळे पाणी लागून तेथे गंज पकडण्याची शक्यता असेल तरच त्यावर रंग पुन्हा लावण्याची गरज आहे. खराब दिसतो तो म्हणून स्क्रॅच काढण्यासाठी आटापिटा करण्याची वैयक्तिक कार वापरणाऱ्यांची असणारी मानसिकता काही प्रमाणात तरी कमी व्हायला हवी. अशा कामांसाठी स्टिकरचाही वापर करता येऊ शकतो. त्यासाठीचे लॅमिनेशन पद्धतीचे स्टिकर्सही वापरता येतात. त्यामुळे तुम्हाला रंगासाठी गॅरेजला जाऊन दोन - तीन दिवस वेळ घालवण्याची गरज नाही. अर्थात स्टिकर्सचा हा पर्याय वापरण्यापूर्वी स्क्रॅच कुठे आहे, त्यावर कोणत्या रंगाचा स्टिकर वापरावा, तेथे गंज चढू नये म्हणून स्टिकर लावावा, की त्यातून काही डोळ्यांना चांगले दिसेल असेही स्टिकर वापरावे हे तुमच्यावर व त्या स्क्रॅचवर अवलंबून असेल.

Web Title: What is the reason for scratches on the car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.