‘नॅक’च्या मूल्यांकनात विद्यापीठाची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 07:00 PM2018-11-19T19:00:48+5:302018-11-19T19:02:34+5:30

विश्लेषण : विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अशा शासकीय संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी ‘नॅक’चा उत्तम दर्जा मिळणे आवश्यक आहे.

The University is on test by NACC evaluation | ‘नॅक’च्या मूल्यांकनात विद्यापीठाची लागणार कसोटी

‘नॅक’च्या मूल्यांकनात विद्यापीठाची लागणार कसोटी

googlenewsNext

- राम शिनगारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन सध्या राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) पथकाच्या होणाऱ्या भेटीमुळे तयारीत व्यस्त आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अशा शासकीय संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी ‘नॅक’चा उत्तम दर्जा मिळणे आवश्यक आहे. या दर्जाच्या आधारावर विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख उंचावता येऊ शकतो. यासाठी आगामी काळात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत ‘नॅक’चे समन्वयक डॉ. महेंद्र शिरसाठ व्यक्त करीत आहेत.

देशातील उच्चशिक्षण देणाऱ्या प्रत्येक संस्थेला ‘नॅक’कडून मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय, विद्यापीठांना तर त्याशिवाय भरीव प्रमाणात निधी मिळत नाही. संबंधित संस्थेतील प्राध्यापकांच्या संशोधनासाठी लागणारा निधीही मिळत नाही. यात विद्यापीठांसारख्या संस्थांना तर ‘ए प्लस प्लस’ दर्जा असेल, तर प्रत्येक योजनेतील निधी मिळतोच. यातून मोठ्या प्रमाणात संस्थेचा विकास होऊ शकतो. याशिवाय उद्योग, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतही चांगला दर्जा असणाऱ्या शिक्षण संस्थांची प्रतिमा सुधारते. यामुळे ‘नॅक’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तिसऱ्यांदा  ‘नॅक’ला सामोरे जात आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरू असताना पहिल्यांदा झालेल्या नॅकवेळी ‘बी प्लस प्लस’ दर्जा मिळाला होता. त्यानंतर डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या काळात दुसऱ्या नॅकमध्ये ‘अ’ दर्जा मिळाला. यामुळे आता सर्वांत कठीण अशा तिसऱ्या सायकलमध्ये विद्यापीठाचे मूल्यमापन होणार आहे. यासाठी लागणारा ‘सेल्फ स्टडी रिपोर्ट’ (एसएसआर) दाखल केला आहे. यानुसार ‘नॅक’ने पहिल्या टप्प्यातील दुरुस्त्या विद्यापीठ प्रशासनाला सांगितल्या. त्यानुसार दुरुस्त्या केल्या आहेत. दुरुस्तीची आणखी एक संधी मिळणार आहे. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाविषयीचे मत ‘नॅक’ जाणून घेईल. ही प्रक्रिया संपली की, नॅकची टीम प्रत्यक्ष विद्यापीठाच्या भेटीला येणार आहे. 

विद्यापीठ ‘नॅक’ची तयारी मागील तीन वर्षांपासून करीत आहे. मागील एक वर्षापासून समन्वयक डॉ. महेंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वात डॉ. सूर्यभान सनान्से, डॉ. एम.डी. जहागीरदार, गिरीश काळे, रोहन गव्हाडे, पल्लवी प्रधान हे मेहनत घेत आहेत. याचवेळी प्राध्यापकांमधून डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. प्रभाकर उंदरे यांनीही ‘नॅक’च्या कामाला वाहून घेतले आहे. याशिवाय डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. एन.एन. बंदेला, डॉ. बापूराव शिंगटे, डॉ. धनश्री महाजन, डॉ. संजय मून, डॉ. भारती गवळी आणि कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडेही विशेष जबाबदारी सोपवली आहे. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक यांनीही मागील तीन महिन्यांपासून ‘नॅक’ विभाग सांगेल ती माहिती उपलब्ध करून देण्यास तत्परता दाखवली असल्याचा अनुभव डॉ. शिरसाठ सांगतात. 

विद्यापीठाला मागील वेळी ‘अ’ दर्जा मिळाला होता. हा दर्जा कायम टिकविण्यासह ‘अ प्लस’ मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यासाठी लागणारी सर्व तयारी केली आहे. हा दर्जा मिळाल्यास विद्यापीठाला ‘रुसा’चे १०० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल, तसेच विविध योजनांच्या वार्षिक एक हजार कोटी रुपयांच्या बजेटला पात्र ठरेल. विद्यार्थ्यांना नोकरीसाठी देश-विदेशात लागणारा दर्जाही प्राप्त होईल. एकूणच विद्यापीठाच्या विकासाची दारे चोहोबाजूंनी खुली होणार आहेत. मागील काही काळात प्रशासकीय गोंधळामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र ‘नॅक’मध्ये ‘अ’ किंवा ‘अ प्लस’ दर्जा मिळाल्यास त्यात सुधारणा होणार आहे. यासाठी शेवटच्या महिन्यात सर्वांच्या हातभाराची गरज आहे.

ता.क़ : विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कुलगुरूंच्या प्रशासकीय निर्णयांवर नाराजी असली, तरी कुलगुरूंचा कार्यकाळ ४ जूनपर्यंत असणार आहे. मात्र, विद्यापीठाचे ‘नॅक’ पाच वर्षांसाठी होत आहे. त्यात दर्जा घसरला तर मराठवाड्याची मोठी हानी होईल. यासाठी विद्यापीठाशी संबंधित प्रत्येकाला ‘नॅक’ होईपर्यंत जाबाबदारीने काम करावे लागणार आहे.

Web Title: The University is on test by NACC evaluation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.