हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:45 PM2018-12-06T13:45:29+5:302018-12-06T13:48:30+5:30

हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली.

Songs On Dr. Babasaheb Ambekar : Slowly you Waves, here is my Bhima sleeping, it will not wake up ... | हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

googlenewsNext
ठळक मुद्देआजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले.

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : 

‘हळू याना गं लाटांनो
कुणाला त्रास होईल ना
इथे निजला भीम माझा
तयाला जाग येईल ना...’

महाकवी वामनदादा कर्डकांच्या संवेदनशील लेखणीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ही चिंब अश्रूफुले. सद्गतीत होऊन कंठ दाटून यावा अशी भावपूर्ण आदरांजली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत लाखो गीते, कवणे, शेर, गजला कवींनी लिहिली. गायक, शाहिरांनी गायली. या आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले. हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली. आजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. 

दादरच्या सागर किनारी बाबासाहेबांचा पवित्र देह ठेवण्यात आला. बाबासाहेबांनी उभ्या हयातीत केलेल्या अथक परिश्रमावर वामनदादा पुढे लिहितात,

अशा किती तरी रात्री 
तयाला झोप आली ना 
जरासा लागला डोळा
तयाची झोप मोडेल ना...
नकारे आसवे ढाळू इथे
वामनवाणी आता 
तुमच्या त्या आसवांनी रे 
चिता ही ओली होईल ना....

वामनदादांनी बाबाच्या महापरिनिर्वाणावर शंभराहून अधिक गीते लिहिली आहेत. भीमराव दीनदलित व महिलांसाठी लढले. देह चंदनासम झिजवला. वामनदादा लिहितात, 

देह झिजला कसा
अंत झाला कसा
चंदनाला पुसा, चंदनाला पुसा,
देहसारा भीमाचा थिजला कसा
चंदनाला पुसा, चंदनाला पुसा

 

बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी मुंबईत अथांग जनसागर लोटला. आक्रोश आणि भावविव्हळ न थांबऱ्या वेदना घेऊनच. कुण्या नेत्याच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीचा तो विश्वविक्रमच होता. एक कवी भावना व्यक्त करतो. ‘बाबांची डोली निघाली, अश्रू ढाळी, दलित जणांची माया ही निराळी.’ 

६ डिसेंबर ५६ रोजी बाबा गेल्याची वार्ता कळली व मेघडंबर हेलावले. कवी दिलराज भावूक होऊन व्यक्त होतात, 

‘सहा डिसेंबर छप्पन साली
वेळ कशीही हेरली
दुष्ट काळाने भीमरायांची 
प्राणज्योत ती चोरली...
रडे जनता टाहो फोडुनी
चैत्यभूमी सागरा तिरी
रात्र सहा डिसेंबरची
जीवनी राहिली चिरंतनी  
एक अनाम कवी लिहितो....
बाबा गेले वार्ता कळली
पायाची जमीन ढासळली
लोकांचे काळीज हादरले
झाले वेडे जन बावरले
 नरनारी सारे थरथरले
 काहीच सुचेना घाबरले
कैकांचे भानच गरगरले
आक्रोशाचे वादळ उठले
टाहोचे आभाळ गडगडले 
कुणी धरतीवर लोळत पडले....

कवी काशीनंदा यांना मात्र बाबासाहेबांची ती चंदनाची चिताही मुलांना संदेश देतेय असा भास होतोय, त्यांच्या भावना गायक मनोहरदीप रुसवा (भगत) अशा ओथंबलेल्या शब्दात गातात....

पेटता पेटता बोलली रे चिता
जा मुलांनो आता संपली रे कथा
संपल्या संपुद्या अश्रूच्या अक्षदा 
लाभली ती योग्य सद्गती...
शब्द मोडू नका, ऊर झोडू नका
जा भविष्यामध्ये धीर सोडू नका....

उसळलेल्या जनसागराची तळमळ होती त्या भीमराणाची अभा एकदा तरी पाहण्याची. त्यासाठीची मनामनात, तनातनात सुरू असलेली धडपड एक कवी, ‘थांबा थांबा, जाळता का चंदनाची ही चिता, पाहू द्या डोळे भरूनी मज भीम हा माझा पिता,’ अशी व्याकूळ नोंदवितो. बाबांनी अतिश्रम केले. २०-२० तास वाचनलेखन करणारे बाबासाहेब तहानभूक विसरून जात. त्यातून त्यांना अनेक व्याधी जडल्या. बाबासाहेबांच्या अंतिम दिनाविषयी शाहीर साळवे म्हणतात, 

गेला भीमराणा
कसा सोडून गेला दलितांचा राणा
मधुमेह, रक्तदाब वाढला
पायांचा आजार वाढू लागला
दृष्टी मंद झाली ना...

बाबासाहेबांच्या महानिर्वाणाबद्दल काही प्रवादही आहेत. त्याकडे कवींची नजर न गेली तरच नवल, गायक प्रकाशनाथ पाटणकर म्हणतात, 

घात झाला जी...
नानकचंद रत्तू हे वदला
मृत्यू होता की होता बदला 
प्रश्न गुपित आहे जी 
घात झाला जी..., 

 

अशीही शेकडो गीते तत्कालीन समाजमनावर बिंबलेली आहेत. 
कवी राजानंद गडपायले लिहितात,

स्मशानी आहे रे दर्या
किनारी जाऊनी आलो
चितेवर देह बाबांचा 
मी जळता पाहूनी आलो...

 

सागर किनारी चैत्यभूमीत प्रज्ञेचा सागर चिरनिद्रा घेत आहे. खळखळत्या सागरी लाटा घोंगावता आवाज करीत येतात वारंवार. अनेकदा हा सागर रौद्ररुप घेतो. त्याच्या या रुपाला पाहून एक कवी लिहितो ,   

अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरा
दीनासाठी कष्ठ साहिले माझ्या भीमाने
हक्क मिळवून दिले मोठ्या श्रमाने
सोडून गेली गाई आपल्या वासरा...

 

खरंच तोड नाही हो जगात करणीला एक हिऱ्याने दीपावले धरणीला, असे म्हणत गेल्या ६१ वर्षापासून सतत दरवर्षी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर जातात. आपल्या लाडक्या बाबाला अभिवादन करतात. बाबांची ही समाधी असंख्य दीनदुबळ््या, वंचितांची प्रेरणा, ऊर्जास्थान आहे. त्यावर महाकवी वामनदादांची एक अजरामर गजल अशी,

समाधीकडे ती वाटही वळावी
तेथे आसवांची फुले ही गळावी...

Web Title: Songs On Dr. Babasaheb Ambekar : Slowly you Waves, here is my Bhima sleeping, it will not wake up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.