प्रदीप जैस्वाल यांना पत्नीशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:04 AM2018-01-23T01:04:30+5:302018-01-23T01:04:30+5:30

माजी आमदार तथा शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नी सरोज जैस्वाल (४८) यांचे सोमवारी सायंकाळी ५.३० वा. निधन झाले.

 Pradip Jaiswal's wife passes away | प्रदीप जैस्वाल यांना पत्नीशोक

प्रदीप जैस्वाल यांना पत्नीशोक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : माजी आमदार तथा शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नी सरोज जैस्वाल (४८) यांचे सोमवारी सायंकाळी ५.३० वा. निधन झाले. मागील दोन वर्षांपासून त्या आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची सोमवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती प्रदीप जैस्वाल, मुले निखिलेश, ऋषिकेश, सून दीपाली जैस्वाल तसेच दीर अशोक जैस्वाल, दिलीप जैस्वाल, मनोज जैस्वाल, संतोष जैस्वाल असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता शिवसेनेसह सर्वच राजकीय, सामाजिक विश्वात वा-यासारखी पसरली. जैस्वाल यांच्या समर्थनगर येथील निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सरोज यांचे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे माहेर असून, त्यांच्यासह दोन बहिणी व तीन भावंडांसह आई-वडिलांसोबत त्या वाढल्या. २३ जून १९८८ साली त्यांचा विवाह प्रदीप जैस्वाल यांच्याशी झाला. जैस्वाल यांच्या राजकीय कारकीर्दीत त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिल्या. राजकारणाच्या चढ-उतारात जैस्वाल यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षात जैस्वाल यांना पत्नी सरोज यांनी मोलाची साथ दिली. १९८८ ते १९९९ हा जैस्वाल यांचा राजकीय प्रवास उंचावणारा कालखंड होता. १९९९ ते २००९ या दहा वर्षांत जैस्वाल यांनी अनेक चढ-उतार पाहिले. या काळात सरोज या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. २००९ ला जैस्वाल अपक्ष विजयी होण्यात पत्नी सरोज यांची प्रचंड मोलाची मदत राहिली. जैस्वाल राजकारणात अहारोत्र सक्रिय असताना सरोज यांनी मात्र कुटुंबाला सर्वाधिक वेळ दिला. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जैस्वाल यांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.


आज अंत्यसंस्कार होणार
मंगळवार, २३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. सरोज जैस्वाल यांची अंत्ययात्रा शाकुंतल निवास, निराला बाजार, समर्थनगर येथून निघेल. कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title:  Pradip Jaiswal's wife passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.