औरंगाबादेत उपमहापौर सव्वा वर्षातच बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:37 AM2018-05-25T11:37:05+5:302018-05-25T11:38:57+5:30

महापालिकेत अडीच वर्षांसाठी भाजपच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद सव्वा वर्षातच बदलावे, त्या ठिकाणी पक्षातील एखाद्या नगरसेवकाला संधी देऊन उपकृत करावे, अशी मागणी भाजपमधील एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची चर्चा सुरू असून, त्या मागणीच्या अनुषंगाने उपमहापौरपद सव्वा वर्षात बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Movement for change in Aurangabad's Deputy Mayor | औरंगाबादेत उपमहापौर सव्वा वर्षातच बदलण्याच्या हालचाली

औरंगाबादेत उपमहापौर सव्वा वर्षातच बदलण्याच्या हालचाली

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यमान उपमहापौर विजय औताडे यांची महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी प्रचंड जवळीक निर्माण झाली आहे. ते भाजपचे आहेत की, शिवसेनेचे हे कळण्यास मार्ग नसल्याची खंत काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे.

औरंगाबाद : महापालिकेत अडीच वर्षांसाठी भाजपच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद सव्वा वर्षातच बदलावे, त्या ठिकाणी पक्षातील एखाद्या नगरसेवकाला संधी देऊन उपकृत करावे, अशी मागणी भाजपमधील एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची चर्चा सुरू असून, त्या मागणीच्या अनुषंगाने उपमहापौरपद सव्वा वर्षात बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

विद्यमान उपमहापौर विजय औताडे यांची महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी प्रचंड जवळीक निर्माण झाली आहे. या जवळीकतेमुळेच औताडे यांना चारचाकी वाहन मिळाल्याची चर्चा आहे. तसेच कर्ज काढण्यासारख्या प्रकरणात चर्चा करण्याऐवजी उपमहापौर सभागृहातून काही वेळेसाठी बाहेर गेले होत. ठरावावरील चर्चा अंतिम टप्प्यात आल्यानंतर ते सभागृहात आले, त्यांची गैरहजेरी सेनेच्या धोरणासाठी फायदेशीर ठरल्याचे मत भाजपमधील एक गट व्यक्त करीत आहे. ते भाजपचे आहेत की, शिवसेनेचे हे कळण्यास मार्ग नसल्याची खंत काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे.

दुसरीकडे पक्षातील सहा नगरसेवकांना आजवर कुठल्याही पदावर संधी मिळालेली नाही. पुढच्या वर्षी स्थायी समितीमध्ये त्यातील दोन जण जातील. चौघांपैकी सभापतीपदी एकाची वर्णी लागेल. त्यामुळे एकाला उपमहापौर केल्यास समान संधी दिल्याचा संदेश जाईल. सर्व नगरसेवकांमध्ये समाधानाची भावना राहील. त्यामुळे उपमहापौर औताडे यांना सव्वा वर्ष कार्यरत ठेवावे व ज्यांना आजवर काहीही संधी मिळाली नाही, अशांपैकी एका नगरसेवकाला उर्वरित सव्वा वर्षाचा कालखंड द्यावा, अशी मागणी वरिष्ठांकडे लावून धरण्यात येत आहे. 

सगळे निर्णय वरिष्ठांच्या हाती
भविष्यात शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण कसे राहील, हे सांगता येणे अवघड आहे. त्यामुळे पालिकेत पक्षाची भूमिका आणि धोरणे लावून धरणाऱ्या व्यक्तींना वैधानिक पदांवर बसविण्याबाबत वरिष्ठ नेते विचार करू लागले आहेत. त्याआधारेच औताडेंना सव्वा वर्षानंतर बदलण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. 

प्रवक्ते बोराळकर म्हणाले...
भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, सव्वा वर्ष उपमहापौरपद वाटून घेण्याबाबत चर्चा झाली होती. सध्या तशी काही मागणी सुरू झाली असेल तर वरिष्ठांच्या निर्णयानुसारच यापुढे निर्णय होईल.

कोअर कमिटीतही झाली होती चर्चा
भाजप कोअर कमिटीतही सव्वा वर्ष उपमहापौरपद देण्याबाबत चर्चा झाली होती. नगरसेवक नितीन चित्ते, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांची नावे पुढे आली होती. पण ऐनवेळी औताडे यांचे नाव पुढे आले. सव्वा वर्ष उपमहापौरपद एकेकाला देऊन सर्वांना समान न्याय देण्याबाबत कोअर कमिटीचे सर्व सदस्य अजूनही ठाम आहेत. औताडे सध्या शिवसेनेच्या मांडीवर बसल्यासारखे वागू लागल्यामुळे सव्वा वर्षच त्यांना या पदावर ठेवण्याबाबतच्या चर्चेने जोर धरला आहे.

Web Title: Movement for change in Aurangabad's Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.