औरंगाबादेत सायबर क्राईम सेलचे झाले ठाण्यात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:35 PM2018-05-09T19:35:12+5:302018-05-09T19:36:15+5:30

राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले.

Cyber ​​crime cell in Aurangabad has been converted to Thane | औरंगाबादेत सायबर क्राईम सेलचे झाले ठाण्यात रुपांतर

औरंगाबादेत सायबर क्राईम सेलचे झाले ठाण्यात रुपांतर

googlenewsNext

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. औरंगाबादेतील पहिल्या सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस आयुक्तालयात २०१६ साली १५३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर गतवर्षी (२०१७) गुन्ह्यांचा आकडा वाढून १६९ झाला होता. यावर्षी जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत सायबर कायद्याच्या विविध कलमान्वये ६० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. मोबाईल, संगणकाच्या साह्याने आॅनलाईन फसवणूक करणे, वेबसाईट हॅक करणे, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावरून महिला, मुलींची बदनामी करणे, अशा प्रकारचे हे गुन्हे असतात. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या संख्येचा विचार करता पाच वर्षांपूर्वी शहर पोलीस दलासाठी स्वतंत्र सायबर लॅब स्थापन करण्यात आली. सायबर लॅबकरिता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. 

शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्यासंदर्भात स्वतंत्र निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. यावर लोकमतने प्रकाश टाकला. यानंतर औरंगाबादेतील सायबर लॅबचे रुपांतर सायबर ठाण्यात करण्याचे निर्देश सायबर क्राईम सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिले. तसेच सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. वानखेडे यांनी सोमवारी सकाळी सायबर ठाण्याचे पहिले निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

कार्यपद्धती अस्पष्ट
सायबर ठाण्यात रुपांतर झाले तरी या ठाण्याचे कामकाज कसे चालेल. त्यासाठी स्वतंत्र आस्थापना, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर यापुढे आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व सायबर गुन्हे पूर्वीप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होतील अथवा सायबर ठाण्यात, याबाबत संभ्रम आहे. 

Web Title: Cyber ​​crime cell in Aurangabad has been converted to Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.