शोभायात्रेतून सांस्कृतिक दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:19 AM2018-03-19T01:19:45+5:302018-03-19T01:20:45+5:30

महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर मराठमोळा फेटा, हातात झेंडा आणि सोबत ढोल-ताशांचा गजर, अशा मंगलमय वातावरणात रविवारी (दि.१८) गुढीपाडवा आणि नववर्षारंभानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रातर्फे जयभवानीनगर येथून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Cultural presentation through decorative rally | शोभायात्रेतून सांस्कृतिक दर्शन

शोभायात्रेतून सांस्कृतिक दर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर मराठमोळा फेटा, हातात झेंडा आणि सोबत ढोल-ताशांचा गजर, अशा मंगलमय वातावरणात रविवारी (दि.१८) गुढीपाडवा आणि नववर्षारंभानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रातर्फे जयभवानीनगर येथून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत ढोल पथक आणि युवतींनी सादर केलेल्या विविध चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
जयभवानीनगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेस सुरुवात झाली. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, नगरसेविका कीर्ती शिंदे, माधुरी अदवंत, उषा गिरी, स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्राचे मराठवाडा विभागप्रमुख विलासराव देशमुख, कलप्पा पाटील, रामकृष्ण गाढे, विनायक पाटील, नीलेश सुरासे, रामचंद्र दर्प, बबन डिडोरे पाटील, जयदीप साखरे, लक्ष्मण औटे, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्व शहराध्यक्ष राजेश पवार, सोमेश्वर जाधव, महेंद्र शिंदे यांची उपस्थिती होती.
शोभायात्रेत अग्रभागी आकर्षक अशा रथात मुलांनी भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांची वेशभूषा साकारली होती. पाठोपाठ असलेल्या पालखीत श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा विराजमान होती. ठिकठिकाणी महाराजांचा जयघोष करण्यात आला. शोभायात्रेच्या मार्गात नागरिक दर्शनासाठी गर्दी करीत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारलेल्या युवकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झांज पथक आणि ढोल पथकाच्या सादरीकरणावर अनेकांनी ठेका धरला. घोडे, उंटावर स्वार मुले, बॅण्ड पथक, टाळ-मृंदगांसह सहभागी झालेले भजनी मंडळाच्या सादरीकरणासह पर्यावरण संरक्षणाचा संदेशही शोभायात्रेतून देण्यात आला. यावेळी युवतींनी लाठ्या-काठ्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. गजानन महाराज मंदिर चौकमार्गे गारखेडा परिसरातील मारुती मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला.

Web Title: Cultural presentation through decorative rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.