मेळघाटात ऊन-सावल्यांची पाठशिवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:01 AM2019-04-24T01:01:12+5:302019-04-24T01:03:45+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे.

Wrestling of wool-shadows in Melghat | मेळघाटात ऊन-सावल्यांची पाठशिवणी

मेळघाटात ऊन-सावल्यांची पाठशिवणी

googlenewsNext
ठळक मुद्देबोडके झाले रान : पर्यटकही पडले मोहात

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे. त्यातही दिवसभर ऊन-सावल्यांचा पाठशिवणीचा सुरू असलेला खेळ पर्यटकांना मोहिनी घालणारा ठरला आहे.
राज्यातील एक अग्रगण्य थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा पर्यटनस्थळाचा नावलौकिक आहे. समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेल्या या पर्यटनस्थळावर हजारो पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. येथील विविध ऐतिहासिक व महाभारतकालीन वास्तूंचा जतन केलेला ठेवा, मनोवेधक पॉइंट, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणारे धबधबे, गगनचुंबी हिरव्या डोंगररांगा, दाट धुके अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांनी चिखलदरा समृद्ध आहे. उन्हाळा लागताच मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्याने हिरवेगार असलेले मेळघाट जंगल व विविध पॉइंट आता वाळवंटासम झाले आहेत. डोंगर-दऱ्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. पानगळ झाल्याने झाडांचे सांगाडे तेवढे उभे आहेत.

घाटवळण अन् उंच पहाड
चिखलदरा पर्यटनस्थळावर येणाºया पर्यटकांना ऊन-सावल्यांचा खेळ मोहात पाडून जातो. घाटवळणाच्या उंच पहाडावर पर्यटकांची वाहने थांबण्याची काही ठिकाणे आहेत. तेथे पर्यटक थांबून तेथून सावल्यांच्या खेळाचा मनोवेधक नजारा पाहतात. सावलीच्या मागे ऊन धावत असल्याचे हे चित्र लक्षवेधी ठरले आहे. संपूर्ण उन्हाळाभर मेळघाटच्या घनदाट जंगल वाळवंटाप्रमाणे भासत असले तरी मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळताच सांगाडे दिसत असलेल्या झाडांवर नवीन पालवी फुटते; हिरवेगार घनदाट जंगल डोळ्यांचे पारणे फेडते, हे विशेष.

कमी पाऊस, वृक्षतोड आणि वणवा
मेळघाटात दरवर्षी पावसाची नोंद कमी-कमी होत असल्याचे गंभीर चित्र आहे. दुसरीकडे जंगलात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड आणि मानवनिर्मित आगी संतापजनक आहे. जंगलात वृक्षतोड करून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण व शेतजमीन तयार करणे तसेच तेंदुपत्ता, मोहफुले, बारशिंगे उचलता यावी आणि गुरांसाठी चारा मोठ्या प्रमाणात निघावा, या आणि इतर कारणांसाठी जंगलात आगी लावण्यात येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. वनविभाग आणि आदिवासींचा या मुद्द्यावर अनेकदा संघर्ष उडाला आहे.

Web Title: Wrestling of wool-shadows in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट