रेल्वेत नोकरीची बतावणी, लाखोंची फसवणूक; आंतरराज्यीय रॅकेट उघड!

By प्रदीप भाकरे | Published: March 9, 2023 05:32 PM2023-03-09T17:32:22+5:302023-03-09T17:34:05+5:30

महिलेची फसवणूक करून बोगस नियुक्तीपत्रही दिले; गुन्हा दाखल, प्रकरण इओडब्ल्यूकडे

woman in amravati duped by 50 lakh showing lure of job in railways, inter-state racket exposed! | रेल्वेत नोकरीची बतावणी, लाखोंची फसवणूक; आंतरराज्यीय रॅकेट उघड!

रेल्वेत नोकरीची बतावणी, लाखोंची फसवणूक; आंतरराज्यीय रॅकेट उघड!

googlenewsNext

अमरावती : रेल्वेत नोकरी लावून देण्याची बतावणी करून येथील एका महिलेची तब्बल ५० लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ८ मार्च रोजी सायंकाळी एकूण १४ जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सन २०२१ ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान ती फसवणुकीची मालिका चालली. येथील एक आरोपी नवी दिल्लीचा आहे. 

नवसारी रोडवरील प्रिया पार्क येथे राहणाऱ्या सचीन नामक मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याची बतावणी करण्यात आली. मोठी पोस्ट असल्याने काही लाख रुपये भरले तर डायरेक्ट नियुक्तीपत्र देतो, अशा थापा मारण्यात आल्या. दरम्यानच्या काळात अनेकदा मोठी रक्कम घेऊन सचीनला रेल्वेमध्ये नोकरीचे खोटे दस्तावेज देण्यात आले. नियुक्तीपत्र व दुसऱ्या पानावर इंग्रजीत अटी शर्ती असलेल्या त्या दस्तावेजावर खोटी शासकीय मुद्रा व स्वाक्षरी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणुकीच्या या मालिकेत सात ज्ञात आरोपींसह सचिन व त्याच्या आईला अन्य सातजण देखील भेटले. ते सातही जण वेगवेगळ्या भूमिकेत होते.

नियुक्तीपत्र दिल्यानंतर मुंबईच्या डीएमआर कार्यालयसह खारघर रेल्वे स्टेशनवर त्याला प्रशिक्षण देखील देण्यात आले. तर सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल दिल्ली येथे सचिनचे मेडिकल देखील करण्यात आले. मात्र, ८ डिसेंबर २०२२ पर्यंतही नेमकी प्रत्यक्षात नियुक्ती न मिळाल्याने सचिन व त्याच्या आईने आरोपींना फोन कॉल केले. त्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली. तोपर्यंत आरोपींनी रेल्वे व मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्व्हीसमध्ये नोकरी देण्याची बतावणी करून सचिनची आई व त्याच्या मावसभावांकडून तब्बल ४९ लाख ६५ हजार रुपये उकळले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिनच्या आईने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.

हे आहेत आरोपी

एस.आर.बाजड, एक महिला (दोघेही रा. अमरावती) , प्रशांत धर्माळे, चेतन राऊत (सिंभोरा रोड), विजय माथूर, अनिकेत मिश्रा (रा. दिल्ली), डॉ. श्रीकांत बानुबाकोडे (रा. भातकुली) या सात जणांविरूध्द फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर, एक पुरूष, मुंबईस्थित डीएमआर कार्यालयाबाहेर भेटलेला इसम, यश नामक मुलगा, खारघर रेल्वे स्टेशनमध्ये प्रशिक्षण देणारी महिला, खारघर येथे ट्रेनिंगसाठी पाठविणारा संदीप देशमुख, सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल दिल्ली येथे मेडिकल करणारा व्यक्ती व कल्याण रेल्वे स्टेशनबाहेर कागदपत्र घेणारा एक अशा एकुण सात अनोळखींचे नावे देखील एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत.

Web Title: woman in amravati duped by 50 lakh showing lure of job in railways, inter-state racket exposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.