खळबळजनक! पत्नीची चाकूने भोसकून हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 05:59 PM2022-08-05T17:59:47+5:302022-08-05T18:00:52+5:30

चांदूर बाजारच्या महात्मा फुले कॉलनीत थरार, पोलिसांनी वाचविले प्राण

Wife stabbed to death, husband attempted suicide in chandur bazar | खळबळजनक! पत्नीची चाकूने भोसकून हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक! पत्नीची चाकूने भोसकून हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

चांदूर बाजार (अमरावती) : स्थानिक महात्मा फुले कॉलनी परिसरात एक वर्षापासून भाड्याने राहत असलेल्या कुटुंबात आपापसातील वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी वेळीच दाखल होऊन त्याला वाचविले. त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनुसार, शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास काही नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याला महात्मा फुले परिसरात युवकाने गळफास घेतल्याचे कळविले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराचे दार आतून बंद होते. त्यामुळे दार तोडून घरात प्रवेश करण्यात आला. पहिल्या रुममध्येच आरोपी सतीश ऊर्फ किशोर काळबांडे (४५) हा एका कापडाच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लगतच्या स्वयंपाकखोलीत मृत श्रुतिका काळबांडे (४०) रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ती त्याची पत्नी होती.

चांदूर बाजार पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सतीश काळबांडेला खाली उतरवण्यात आले. यावेळी तो जिवंत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावत असल्याने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. घटनास्थळाहून पोलिसांनी रक्ताने माखलेला चाकू जप्त केला आहे.

सकाळी १० च्या सुमारास मृत श्रुतिका व सतीश यांच्यात वाद झाला. सतीशने घरातील चाकूने श्रुतिकाच्या पोटामध्ये सपासप वार केले. त्यामुळे ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली व जागीच गतप्राण झाली. मात्र, झालेल्या प्रकाराला घाबरून सतीशने दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दाम्पत्य कोल्हा-काकडाचे

मृत श्रुतिका काळबांडे या चांदूर बाजार येथील खाजगी शिक्षण संस्था शिक्षिका होत्या. त्या आपल्या १५ वर्षीय मुलासोबत महात्मा फुले कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होत्या, तर आरोपी पती सतीश काळबांडे कोल्हा काकडा या मूळ गावी राहत होता. तीन दिवसांपूर्वी तो चांदूर बाजार येथे आला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

आई-वडील चिखलदऱ्याला

अमरावतीनजीक कठोरा हे माहेर असलेल्या मृत श्रुतिकाचे आई-वडील हे घटना घडली त्यावेळी चिखलदऱ्याला होते. त्यामुळे वृत्त लिहिस्तोवर ते घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

सतीश अत्यवस्थ

बराच वेळ फासावर झुललेल्या सतीशची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्याचा जबाब घेता आला नाही. यामुळे या प्रकरणाला नेमके कारण काय ठरले, हे अद्याप पुढे आलेले नाही.

Web Title: Wife stabbed to death, husband attempted suicide in chandur bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.