आईसह दोन बहिणींची प्रकृती बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:07 PM2019-01-19T23:07:25+5:302019-01-19T23:09:13+5:30

शाळेच्या आवारातील जीर्ण भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या वैभव गावंडेच्या आईसह दोन बहिणींना शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोकमग्न अवस्थेमुळे या मायलेकींची प्रकृती ढासळली आहे.

Two sisters' mother's condition worsened | आईसह दोन बहिणींची प्रकृती बिघडली

आईसह दोन बहिणींची प्रकृती बिघडली

Next
ठळक मुद्देभिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण : मुख्याध्यापकासह दोन शिक्षक अटकेत, तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू (अमरावती) : शाळेच्या आवारातील जीर्ण भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या वैभव गावंडेच्या आईसह दोन बहिणींना शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोकमग्न अवस्थेमुळे या मायलेकींची प्रकृती ढासळली आहे.
आष्टीतील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयातील जीर्ण भिंत अंगावर कोसळल्याने विद्यार्थी वैभव हरिदास गावंडेचा मृत्यू झाला, तर सार्थक जगदीश भुजाडे (१४), प्रतीक विकास पायथडे (१३, दोन्ही रा. देवरी निपाणी) व आदित्य महादेव बुध (रा. अनकवाडी) हे विद्यार्थी जखमी झाले. या गंभीर घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचे शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले होते. पोलीस प्रशासनासह आ. बच्चू कडू यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जुन्या इमारती धोकादायक स्थितीत असताना शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घेतली नाही, असा पालक, नागरिकांचा आक्षेप होता.
दरम्यान, वलगाव पोलिसांनी शनिवारी जखमी आदित्य बुध याचे बयाण नोंदविले. शाळेतील शिक्षकांनी स्वच्छता करण्यासाठी पाठविले होते. यानंतर लघुशंकेसाठी गेल्यावर ही घटना घडल्याचे आदित्यने बयाणात म्हटले आहे. आता अन्य जखमी मुलांचे बयाण पोलीस नोंदविणार आहेत. सद्यस्थितीत तिन्ही जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
मृत वैभव गावंडे याचे घर कुडामातीचे असून, परिस्थिती अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. त्याच्या मृत्यूनंतर गावंडे कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आहे. शोकमग्न कुटुंबीयांच्या पोटात अन्नाचा दाणा गेलेला नाही. त्यांच्या डोळ्यांतून वाहणाºया अश्रूंचा ओघ थांबलेला नाही. परिणामी शनिवारी सकाळी वैभवच्या आईसह मोठी बहीण दीक्षा व लहानी प्रतीक्षा यांची प्रकृती बिघडली. तिघींनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आष्टी येथील शाळेत विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी शनिवारी दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वैभवचा धाकटा भाऊ प्रत्यक्षदर्शी
वैभव गावंडे हा आठवीत शिकत होता, तर त्याचा धाकटा भाऊ आदेश हा पाचव्या वर्गात शिकतो. शाळेतील दुपारच्या सुट्टीत वैभवसोबत आदेशही होता. वैभव उपाशीपोटी शाळेत गेल्यामुळे आदेशने घरून त्याच्यासाठी डब्यात खिचडी आणली होती. दोघेही दुपारच्या सुट्टीत खिचडी खाणार होते. त्यापूर्वी वैभव जीर्ण खोलीत गेला. त्याच्यासोबत अन्य मित्रसुद्धा गेले. त्याचवेळी भिंत कोसळली. त्याखाली वैभव दबला. त्याची किंकाळी ऐकून बाहेर उभा असलेला आदेश धावून गेला आणि वैभवच्या अंगावर पडलेले दगड उचलणे सुरु केल्याचे तो सांगत आहे. त्यानंतर गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन मलब्याखाली दबलेल्यांना बाहेर काढले.
मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांना अटक
वैभव गावंडे याच्या मृत्यूप्रकरणात त्याचा मामेभाऊ संजय किसन थोरात यांनी वलगाव पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप वामन अमदुरे (५२, रा. शिव कॉलनी), शिक्षक सुनील गोरखनाथ जाधव (४०, रा. जवाहरनगर) व गणेश किसन शेटे (५६, रा. वलगाव) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली. भिंत जीर्ण असल्याचे माहिती असताना मुख्याध्यापकासह शिक्षकांनी दखल घेतली नाही, उलट विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी तेथे पाठविल्याची माहिती आहे. त्यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा विद्यार्थ्याच्या जिवावर बेतला.
साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार
वैभवच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर शुक्रवारी रात्री त्याचे पार्थिव कुटुंबीय देवरी निपाणीला घेऊन गेले. गावंडे यांच्या घरी एकत्र आलेले नातेवाइकांसह गावकऱ्यांनी रात्री ९ वाजताच्या नंतर वैभवच्या पार्र्थिवावर गावातील स्मशानभुमित अत्यसंस्कार आटोपले. यावेळी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दु:खावेगाला वाट दिली. वैभवच्या करुण अंताची चर्चा जिल्हाभरात होती.
रवी राणा यांच्याकडून गावंडे कुटुंबाचे सांत्वन
मृत वैभवच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शनिवारी आ. रवि राणा यांनी देवरी निपाणी गाठले. त्यांनी गावंडे कुटुंबीयांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या. यावेळी वडील हरिदास गावंडे, आई संध्या, आजी शांताबाई, मोठे वडील देविदास गावंडे तसेच प्रभाकर गावंडे, नागोराव गावंडे, रामदास गावंडे, मनोहर गावंडे, मिलिंद गावंडे, मोतीराम गावंडे या कुटुंबीयांसह युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख जितू दुधाने, अजय मोरय्या, नंदकिशोर कुयटे, राजू पारिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवनीत रवी राणा यांनी जखमी तीन मुलांची जिल्हा सामान्य रुग्णालयात विचारपूस केली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Two sisters' mother's condition worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.