विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:29 AM2018-08-31T01:29:30+5:302018-08-31T01:30:21+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रणाली लागू केली. मात्र, निकालात प्रचंड त्रुटी असून, एकाच विद्यार्थिनीला दोन गुणपत्रिका देण्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची आॅनलाईन प्रणाली किती कार्यक्षम आहे, हे स्पष्ट होते.

Two point sheets given by the university to the same student | विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका

विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका

googlenewsNext
ठळक मुद्देसेमिस्टर पॅटर्न निकालात त्रुटी : निकाल जाहीर झाल्यानंतर २१ दिवसांनंतर गुणपत्रिका

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाने पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रणाली लागू केली. मात्र, निकालात प्रचंड त्रुटी असून, एकाच विद्यार्थिनीला दोन गुणपत्रिका देण्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची आॅनलाईन प्रणाली किती कार्यक्षम आहे, हे स्पष्ट होते. चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयातील बी.ए. भाग १ च्या स्वाती नामदेवराव थोटे या विद्यार्थिनीला दोन गुणपत्रिका दिल्या आहेत.
महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रणाली अमरावती विद्यापीठाने लागू केली. शैक्षणिक सत्र २०१८-२०१९ या वर्षातील प्रथम आणि द्वितीय सेमिस्टर पॅटर्न परीक्षा महाविद्यालयाच्या देखरेखीत घेण्यात आल्यात. त्यानुसार द्वितीय सेमिस्टर पॅटर्न उन्हाळी परीक्षा २०१८ चा निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठाने द्वितीय सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल ४ आॅगस्ट रोजी लावल्याचे गुणपत्रिकेत नमूद केले आहे. वस्तुत: गुणपत्रिका विद्यार्थ्यांना २१ दिवस उशिरा म्हणजे २५ आॅगस्ट रोजी देण्यात आली. विद्यापीठ कायद्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १० दिवसांत परीक्षेचा अर्ज सादर करता येतो. मात्र, १० दिवसांनंतर परीक्षा अर्ज सादर केल्यास विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारणी केली जाते. मुळात निकाल उशिरा जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना विलंबाने गुणपत्रिका देण्यात आल्या. हा सर्व प्रकार विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या गलथान कारभारामुळे घडला आहे. असे असताना विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरताना उशीर झाल्यामुळे विलंब शुल्क का भरावे, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रथम आणि द्वितीय सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल लागल्यामुळे आता आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेचा अर्ज भरणे आणि तृतीय सेमिस्टरला प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रारंभ करताना विद्यापीठाकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. महाविद्यालयांकडे या परीक्षेची जबाबदारी निश्चित करताना विद्यापीठाने प्राचार्यांची कार्यशाळा घेऊन याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. परंतु, सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर करताना ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांना गुणपत्रिकेत गुण मिळाले नाही. दुसरा विषय दर्शवून विद्यार्थ्यांना गैरहजर दखाविले आहे. सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या गुणपत्रिकेत त्रुटी असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न कायम
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयात शिकत असलेल्या मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न कायम आहे. शिष्यवृत्तीच्या आधार असल्याने अनेक मागास विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेऊ शकतात. मात्र, गतवर्षीच्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही. चालू शैक्षणिक वर्षासाठी अद्यापही मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे फार्म भरून घेतले नाही. त्यामुळे शासन मागास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव तर रचत नाही, अशी शंका वर्तविली जात आहे.

‘लर्निंग स्पायरल’ची जबाबदारी काय?
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने गृहपरीक्षेचे (सेमिस्टर पॅटर्न) आॅनलाईन प्रश्नपत्रिका पाठविणे व निकाल जाहीर करण्यासाठी ‘लर्निंग स्पायरल’ नामक एजन्सी नियुक्त केली आहे. मात्र, प्रथम, द्वितीय सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात त्रृटी असल्याचे गुणपत्रिकेवरून स्पष्ट होते. त्यामुळे ‘लर्निंग स्पायरल’कडे नेमकी कोणती जबाबदारी सोपविली, हादेखील संशोधनाचा विषय आहे.

आॅनलाईन गुणपत्रिका अपलोड होताना वीज गूल झाली. तांत्रिक कारणामुळे दोन गुणपत्रिका गेल्या. यात काही गोंधळ, गडबड किंवा चुक नाही.
- राजेश जयपूरकर, प्र. कुलगुरू संत गाडगेबाबा विद्यापीठ

गृहपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एका महाविद्यालयात ४० ते ५० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत त्रुटी आहेत. मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न गंभीर आहे
- प्रा. प्रदीप दंदे, जिल्हाध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)

Web Title: Two point sheets given by the university to the same student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.