उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

By उज्वल भालेकर | Published: December 18, 2023 07:24 PM2023-12-18T19:24:06+5:302023-12-18T19:25:05+5:30

२०२१ मध्ये राबविलेल्या सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्याची मागणी

students protested against the government and hunger strike in amravati | उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

उज्वल भालेकर, अमरावती : सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीच्यावतीने वर्ष २०२१ मध्ये सुरक्षा रक्षकपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. जवळपास ५०० जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. परंतु तीन वर्षांनंतरही या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळाने जाहीर केलेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आंदोलन केले.

सुरक्षा रक्षक मंडळ विभाग अमरावतीच्यावतीने १७ जानेवारी २०२१ रोजी ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून २५ डिसेंबर २०२१ रोजी शारीरिक चाचणी परीक्षा घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मिळालेल्या गुण देखील संकेतस्थळावर देण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी अजूनही मंडळाने जारी केलेली नाही. त्यामुळे यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षक भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती. परंतु अजूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे १६ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत चिता आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाची लोकप्रतिनिधी तसेच शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनातून तत्काळ सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करावा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्ती द्यावी, सुरक्षा रक्षकांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणामध्ये अनंत भताने, डिगांबर सरकटे, राहुल पवार, नरेश बावणकर, अमोल महल्ले. अनिकेत इंगळे, शुभम माथुरकर, विनोद गव्हाणे, मंगेश ठाकरे, चेतन बांडे, सचिन खंडारे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी आहेत.

Web Title: students protested against the government and hunger strike in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.