प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 07:51 PM2018-10-11T19:51:38+5:302018-10-11T19:54:01+5:30

महाविद्यालयांची दादागिरी कोण रोखणार; कुलगुरूंकडून निर्धारित प्रवेश शुल्क  तपासणी

sant gadge baba amravati university affiliated colleges not returning fees after cancelling admission | प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही

प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही

Next

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्यांचे शुल्क परत केले जात नाही, हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. एकाच शाखेच्या प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांत वेगवेगळे प्रवेश शुल्क आकारले जात असल्याप्रकरणी चौकशीलादेखील सुरुवात झाली आहे.

विद्यापीठाने व्यावसायिक, विनाअनुदानित आणि अनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांची कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून नियमावलीदेखील ठरली आहे. असे असताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३८३ महाविद्यालयांमध्ये एकाच शाखेच्या प्रवेशासाठी वेगवेगळे शुल्क घेतले जात असल्याची बाब महाविद्यालयांच्या माहिती पुस्तिकेवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतलेले प्रवेश वैयक्तिक अथवा पालकांच्या बदली कारणांनी ते रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना शुल्काचे नावे घेतलेली रक्कम परत करण्यात येत नाही. एवढेच नव्हे तर प्रवेशाच्यावेळी डोनेशन, विविध शुल्क घेतले जाते. ही रक्कमदेखील प्रवेश रद्द झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना परत केली जात नाही. 

विद्यापीठ नियमानुसार काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्याचेकडून शुल्काच्या नावे घेतलेल्या रक्कमेतून जुजबी रक्कम महाविद्यालयाने घेऊन उर्वरित रक्कम परत करणे अनिवार्य आहे. मात्र, प्रवेश रद्द झाल्यामुळे महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ प्रवेश रद्द करण्यास परवानगी देत नाही. नवीन प्रवेश कुठून आणावे अशा विविध कारणांची यादी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांपुढे प्राचार्यांमार्फत ठेवली जाते. या प्रकाराला अनेक विद्यार्थी बळी पडले आहेत. 
    
महाविद्यालयांमध्ये शुल्क आकारणीच्या रक्कमेबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.  विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्यानंतरही शुल्क परत केले जात नाही. याबाबत तक्रारकर्त्यांनी एखाद्या महाविद्यालयाचे उदाहरण पुराव्यानिशी देणे आवश्यक आहे. याप्रकरणी चौकशी पूर्ण करून कुलगुरुंना अहवाल सादर केला जाईल.
-  राजेश जयपूरकर,
प्र- कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
      
विद्यापीठाने महाविद्यालयांचे माहिती पुस्तिका मागवावी. यात प्रवेशाचे शुल्कात तफावत असल्याची बाब निदर्शनास येईल. महाविद्यालयांना प्रवेश शुल्कात वाढ करायची असल्यास त्यासाठी विद्यापीठातून परवानगी घ्यावी. परस्पर प्रवेश शुल्कात वाढ आणि प्रवेश रद्द झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना रक्कम परत न करणे ही फसवणूक आहे.
- दिनेश सूर्यवंशी,
  व्यवस्थापन परिषद सदस्य, अमरावती विद्यापीठ

Web Title: sant gadge baba amravati university affiliated colleges not returning fees after cancelling admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.