Rana Palapate MLA | राणा पळपुटे आमदार
राणा पळपुटे आमदार

ठळक मुद्देपत्रपरिषद : शांततेचा मार्ग स्वीकारत बेशरमचे रोपटे लावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आ. रवि राणा यांनी कल्याणनगर ते यशोदानगर रस्त्याच्या विकासकामाच्या निधीचे पुरावे सादर करणार असल्याचा गाजावाजा केला; पण ठरल्या वेळेत ते आले नाही. रवि राणा हे पळपुटे आमदार आहेत, हे आता सिद्ध झाले आहे, असे विधान रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत नगरसेवक तुषार भारतीय यांनी केले.
आमदार राणांना रविवारी सकाळी ११ वाजता पत्रपरिषदेमध्ये पुरावे सादर करा, असे आव्हान तुषार भारतीय यांंनी दिले होते. त्यांच्याशी चर्चा करायला आपण तयार आहोत. एक तासापासून त्यांची वाट पाहत आहोत. त्यांनी यावे आणि पुरावे असल्यास द्यावेत, असे भारतीय यावेळी म्हणाले. आमदार राणा यांना त्यांनी न केलेल्या कुठल्याही कामाचे श्रेय घेत तसे सांगत फिरण्याची सवयच जडली आहे. अशा पळपुट्या आमदाराचा बुरखा उतरविण्यासाठीच आपण पत्रकारांसमोर आलो. सोमवारी संविधान दिवस आहे. त्याअनुषंगाने दुपारी २ वाजता खोटारडे आमदार राणा यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांसमवेत शांततेच्या मार्गाने जाऊन बेशरमचे रोपटे लावणार आहे. संविधान दिवस असल्याने कायदा हातात न घेता शांततेत सदर उपक्रम पार पाडू, असे तुषार भारतीय यांनी ठणकावून सांगितले.
कल्याणनगर ते यशोदानगर मार्गाच्या विकासकामाचा प्रश्न माझ्याकडून तरी सुटला आहे. यानंतर आपण या विषयावर बोलणार नसल्याचेही तुषार भारतीय यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला नगरसेविका सुरेखा लुंगारे, भाजप शहर उपाध्यक्ष मुन्ना सेवक, कौशिक अग्रवाल, संपर्कप्रमुख ओमप्रकाश भुतडा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती यांनी पत्रपरिषद सुरू होेण्यापूर्वी हजेरी लावली. मात्र, पत्रपरिषद होत असताना व्यासपीठावर त्यांची उपस्थिती नव्हती, हे विशेष!
नवरा-बायकोची पार्टी
आ. राणा हे कुणाचेच नाहीत. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेससोबत जवळीक साधायची व नंतर त्यांच्याच मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढत गावोगावी फिरायचे, असा त्यांचा स्वभाव आहे. आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे सर्वांना सांगत फिरत आहेत. जेवढा मुख्यमंत्र्यांनी त्यांना निधी दिला, तेवढाच निधी मुख्यमंत्र्यांनी मलाही दिला आहे. आता युवा स्वाभिमानी संघटना ही फक्त नवरा-बायकोची पार्टी उरलेली असल्याचा उल्लेखही तुषार भारतीय यांनी यावेळी केला.
उद्या म्हणतील मुख्यमंत्र्यांना आणा..
आ. राणा हे पालकमंत्र्यासमवेत चर्चा करायला तयार आहेत. तेव्हा आपण पालकमंत्र्यांना का पत्रपरिषदेला आणत नाही, याबाबत भारतीय यांना पत्रकारांनी छेडले. यावेळी भारतीय म्हणाले, ते राणा आहेत; आता पालकमंत्र्यांना आणा म्हणत आहेत, उद्या म्हणतील - मुख्यमंत्र्यांना चर्चा करण्यासाठी आणा...


Web Title: Rana Palapate MLA
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.