विष पाजून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:07 PM2019-02-18T23:07:06+5:302019-02-18T23:07:28+5:30

जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करीत विष पाजून तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी तक्रारीतून केला आहे. नितीन धमू सारसर (३२, रा.बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनोज संगेले, करणे डेंडवाल, कालू डेंडवाल व राजेश जेधे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Poisoning of the youth | विष पाजून तरुणाची हत्या

विष पाजून तरुणाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देनातेवाईकांचा आरोप : राजापेठ, कोतवाली ठाण्यातील पोलिसांवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करीत विष पाजून तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी तक्रारीतून केला आहे. नितीन धमू सारसर (३२, रा.बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनोज संगेले, करणे डेंडवाल, कालू डेंडवाल व राजेश जेधे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. नितीन राजापेठ स्थित भोंगाडे कॉम्प्लेक्स येथे सोमवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने आरोपींविरुद्ध मृताच्या नातेवाईकांनी राजापेठ व कोतवली पोलिसांत तक्रार देऊन कारवाईच्या मागणीसाठी रोष व्यक्त केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
१ फेबुवारी रोजी नितीन सारसर हा कारंजा लाड येथील एका लग्नासमारंभात गेला असता, त्याचे मनोज संगेलसोबत भांडण झाले होते. याचा वचपा काढण्याच्या इराद्याने रविवारी रात्री मनोजने नितीनला गांधी चौकात बोलावले. त्यावेळी नितीन मित्र मधुसूदन निदांणेला सोबत घेऊन गांधी चौकात पोहचताच मनोज व त्याच्या साथीदारांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान मधुसूदन तेथून पळाला. मात्र, मनोज व त्याच्या साथीदारांनी नितीनला पकडून कोठेतरी घेऊन गेल्याचे मधुसूदनने तक्रारीत म्हटले आहे. नितीन रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध त्याचा चालविला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास नितीन बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी कोतवाली पोलिसात नोंदविली. त्यानंतर सोमवारी सकाळी नितीन सारसरचा मृतदेह भोंगाडे कॉम्प्लेक्स स्थित युवा स्वाभिमानीच्या कार्यालयासमोर पडलेला दिसून आला. नितीनच्या तोंडातून फेस निघत असल्याचे आढळून आले. घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी नितीनचा मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, नितीनच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरली. त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. नितीनची हत्या केल्याचा आरोप करीत पोलीस ठाण्यात रोष व्यक्त केला. नितीनशी वादाची सुरुवात गांधी चौकात झाल्यामुळे नातेवाईकांनी मोर्चा कोतवाली ठाण्याकडे वळविला. तेथेही नातेवाईकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
मनोज संगेलनेही केली होती तक्रार
गांधी चौकात नितीन सारसर व मनोज संगेले यांच्यात वाद झाल्यावर मनोज कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचला होता. त्याने नितीनविरुद्ध तक्रार नोंदविली. नितीनने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने मारहाण केल्याचा आरोप मनोज याने नितीनवर केला. याप्रकरणात कोेतवाली पोलिसांनी नितीन सारसरविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

मारहाण करुन विष पाजल्यामुळे नितीनचा मृत्यू झाला, अशा तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
- शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त

Web Title: Poisoning of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.