अमरावतीत पाणी शुद्धतेची ‘नो गॅरंटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:22 PM2017-12-18T22:22:25+5:302017-12-18T22:22:55+5:30

'No Guarantee' of water purity in Amravati | अमरावतीत पाणी शुद्धतेची ‘नो गॅरंटी’

अमरावतीत पाणी शुद्धतेची ‘नो गॅरंटी’

googlenewsNext

आरोग्याशी खेळ : ९० हजारांवर कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुरवठा
वैभव बाबरेकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : पाणी हे जीवन आहे; मात्र अमरावतीकरांना ते नळातून १०० टक्के शुद्ध मिळेलच, हे ठामपणे सांगता येत नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारावरून लक्षात येते. शहरातील ९० हजारांवर कुटुंबीयांपर्यंत पाणी पोहचविणाऱ्या मजीप्राचे काही पाणी नमुने दूषित आढळत आल्याने हा धक्कादायक प्रकार उघड होत आहे.
सिंभोरा ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आलेली पाइप लाइन बहुतांश मुख्य रस्त्यालगत आहे. मात्र, शहरातील अंतर्गत भागात पाइप लाइन काही ठिकाणी नाल्यांमधून गेली आहे. तेथे या पाइप लाइनमध्ये शिरणारे सांडपाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. पाण्याच्या शुद्धतेची हमी देणाऱ्या मजीप्राकडून पाणी तपासणी ही झोननिहाय केली जाते. मात्र, या झोनमधील कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी समन्वय नसल्याचे आढळून येत आहे. पाणीपुरवठा होणाºया ठिकाणाचे पाणी नमुने घेऊन त्याची ओटी टेस्ट केली जाते.
ओटी टेस्टसाठी पाणी नमुन्यात एक केमिकल टाकले जाते. केमिकल पाण्यात पडताच पाण्याला पिवळा रंग आल्यास क्लोरिनचे प्रमाण सिद्ध होते. पिवळा रंग आला नाही, तर ते पाणी दूषित समजण्यात येते. ही प्राथमिक तपासणी मजीप्राचे कर्मचारी करतात की नाही, याबाबत निश्चित सांगता येणे कठीणच आहे. पाणी नमुन्यासंबंधी आकडेवारीचा लेखाजोखा ठेवला जात नसल्याचेही आढळून येत आहे.
ओटी टेस्ट ही मजीप्रा कर्मचारी करतात, तर अनुजीव तपासणीसाठी पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. या तपासणीमध्ये १० टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. यावर उपाययोजनेसाठी मजीप्रा प्रयत्न करीत आहे. तथापि, आजपर्यंत १०० टक्के पाणी शुद्धतेची हमी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अमरावतीकरांच्या आरोग्याशी अशाप्रकारे खेळ केला जात आहे.
दर तासाला पाच हजार लिटर पाणी वाया
सिंभोऱ्यावरून अमरावतीकडे येणारी ही पाइप लाइन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचवते. या मार्गातील हॉटेल चाणक्यजवळील सर्व्हिस रोडवर पाण्याची गळती होत आहे. वडगावजवळील स्टोन के्रशरमधील ट्रकच्या आवागमनामुळे ही पाइप लाइन फुटल्याचा मजीप्रा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. तासभरात पाच हजार लिटर पाणी पाइप लाइनमधून बाहेर पडत असल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया गेले. १६ डिसेंबर रोजी ही गळती सुरु झाली असून, गेल्या दोन दिवसांत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाणी गळती थांबविण्यासाठी मजीप्रा १९ डिसेंबरपासून कार्यवाही करीत आहे. यामुळे पाणीपुरवठ्याबाबत मजीप्रा किती तत्परतेने काम करते, हे यावरून दिसून येत आहे.
पाणी तपासणीचा ताळमेळ नाही
मजीप्राच्या १६ टाक्यांवरून अमरावती व बडनेऱ्यातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मजीप्राच्या आठ झोनमधील कर्मचारी ओटी टेस्टद्वारे पाणी नमुने तपासतात. दररोज प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन पाणी नमुने तपासणी होत असल्याचे मजीप्रा अधिकारी सांगत असले तरी काहीच पाणी नमुने दूषित आढळून येतात. पाणी तपासणीच्या माहितीचे रेकॉर्ड मजीप्राकडे उपलब्ध असायला हवे. मात्र, ते एकत्रित केले जात नाही. झोनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यामध्ये सन्मवय नसल्याने पाणी तपासणीची योग्य आकडेवारी मिळत नाही.
मजीप्राच्या पाणी नमुन्यांची स्थिती
मजीप्राच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणांवरून घेतलेले पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. आॅक्टोबर महिन्यात मजीप्राकडून प्राप्त झालेल्या ७८ पाणी नमुन्यांपैकी सहा पाणी नमुने दूषित आढळून आले. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात ७० पाणी नमुन्यांपैकी सात पाणी नमुने दूषित आहेत. यामध्ये सरस्वतीनगर, साधना कॉलनी, हर्षराज कॉलनी, खडकारीपुरा, राजहिलनगर, प्रवीणनगर, भाजीबाजार, अंबागेट जैन मंदिर या परिसराचा समावेश आहे.
महापालिका : ७० नमुने दूषित
मजीप्राकडून महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या अख्त्यारित येणाºया शाळा, रुग्णालये व अन्य संस्थांची पाणी देयके महापालिकेकडून अदा केली जातात. या अनुषंगाने महापालिकेकडून आॅक्टोबर महिन्यात १५८ पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ४४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत, तर नोव्हेंबरमध्ये १३७ पैकी २६ पाणी नमुने दूषित आले आहेत.
गळतीचे प्रमाण ३० टक्क्यांवर
सिंभोरा धरणातून २५ ते ३५ किलोमीटरची पाइप लाइन मासोदच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचली आहे. येथून दररोज १०० दशलक्ष लिटर पाणी अमरावतीकरांना मिळते. प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणीपुरवठा ग्राह्य धरला जातो. मात्र, या शहरातील पाइप लाइनमधून काही ठिकाणी पाणीगळती सुरूच आहे. आतापर्यंत गळतीचे प्रमाण ४५ टक्क्यांवर होते. मात्र, आता ते प्रमाण कमी होत ३० टक्क्यांवर आले आहे.
अनुजीव तपासणीत काय पाहतात?
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वैज्ञानिक पाणी नमुन्यात केमिकल टाकून पाण्यात कॉलीफॉम जिवाणू आहे किंवा नाही, याचा शोध घेतात. शास्त्रीय पद्धतीने ही तपासणी केल्यानंतर ते पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही, याचा शेरा देतात. दूषित पाण्यात आढळणाºया पाण्यात बॅक्टेरिया असल्याचे सिद्ध होते. बॅक्टेरियामुळे बहुतांश जलजन्य आजारांची उत्पत्ती होत असल्याचे प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचे मत आहे.

मजीप्राचे कर्मचारी नियमित सॅम्पल घेऊन ओटी टेस्टद्वारे पाणी तपासणी करतात. पाणी दूषित आढळल्यास पाइपलाइनमधील गळतीचा शोध घेतला जाते. त्यानुसार पुढील उपाययोजना केली जाते.
- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.

माती किंवा सांडपाण्यातून गेलेल्या पाणी पाइनलाइनमध्ये गळती असेल, तर अशा पाण्यामुळे आजारांची उत्पत्ती होते. अ‍ॅसिडीटी, पोटाचे आजार व काविळसह टायफाईडसारखे संसर्गजन्य आजार बळावतात.
- अतुल यादगिरे, कॅन्सर सर्जन, अमरावती.

Web Title: 'No Guarantee' of water purity in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.