शिक्षणमंत्र्यांनी दिले विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:57 AM2019-01-05T01:57:43+5:302019-01-05T01:57:53+5:30

मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले.

Education Minister ordered student arrest orders! | शिक्षणमंत्र्यांनी दिले विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश!

शिक्षणमंत्र्यांनी दिले विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश!

googlenewsNext

- गणेश देशमुख

अमरावती : ‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?’ हा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाय त्याचे चित्रीकरण करणा-या अन्य विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
ही घटना येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी घडली. मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले. माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंत्री जायला निघाले. मात्र विद्यार्थ्यांनी गलका केल्यानंतर तावडे यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने वरील प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो रूचला नाही.
पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करण्यास आणि झालेले चित्रण डिलीट करण्यास सांगितले. काहींनी तसे केलेही.
परंतु युवराज मनोहर दाभाडे या विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले; तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही
पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे बाणेदार उत्तर देत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले.
या प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी, ‘प्रायव्हसी हर्ट’ होत असल्यामुळे या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांनी दिले.
पोलिसांनी लगेच युवराजचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थी वाहनामागे धावत गेले. युवराजला सोडण्याचा धोशा लावला. काही शिक्षकांनी तावडे यांनाही युवराजला सोडण्याची विनंती केली.
मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला पोलीस वाहनातून उतरवून दिले; परंतु त्याचा मोबाईल परत केला नाही.
या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व
पोलीस कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला.

Web Title: Education Minister ordered student arrest orders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.