सत्ताधीशांनी दडविला ‘डेंग्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:18 PM2018-09-18T22:18:39+5:302018-09-18T22:19:36+5:30

स्वच्छतेच्या स्टार मानांकनातील निकषांवर चर्चा करण्याची मागणी फेटाळून लावत महापालिकेची आमसभा मंगळवारी गोंधळात स्थगित करण्यात आली. तत्पूर्वी, सभागृहात स्वच्छतेबाबत चर्चा झालीच पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेस व बसप, शिवसेना सदस्य आक्रमक झाले.

Drugs 'Dengue' | सत्ताधीशांनी दडविला ‘डेंग्यू’

सत्ताधीशांनी दडविला ‘डेंग्यू’

Next
ठळक मुद्दे‘महापौर मुर्दाबाद’चे नारे : सभा स्थगितीवर विरोधी पक्ष आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छतेच्या स्टार मानांकनातील निकषांवर चर्चा करण्याची मागणी फेटाळून लावत महापालिकेची आमसभा मंगळवारी गोंधळात स्थगित करण्यात आली. तत्पूर्वी, सभागृहात स्वच्छतेबाबत चर्चा झालीच पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेस व बसप, शिवसेना सदस्य आक्रमक झाले. मात्र, त्या विषयावर पुढील आमसभेत चर्चा करू, असा पवित्रा महापौरांनी घेतला. तो कुणाच्याही पचनी पडला नाही. त्या गोंधळातच सत्ताधीशांना डेंग्यूचे अपयश लपवायचे होते. त्यासाठी सभा स्थगित करण्यात आल्याचा आरोप विरोधी बाकावरील सदस्यांनी केला.
विरोधी बाकांवरील सदस्यांना डेंग्यूबाबत चर्चा करून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई घडवून आणायची होती. मात्र, सत्ताधीशांनी सभा स्थगितीचा निर्णय घेतला. हा नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी विषयपत्रिका फाडली.
मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आमसभेस सुरुवात झाली. प्रशासकीय विषय संपल्यानंतर डेंग्यू आणि आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा होणार होती. तत्पूर्वी, स्थायीकडून आलेल्या विषयावर चर्चा झाली. महापालिकेच्या व्यावसायिक संकुलातील ज्या गाळ्यांचे नवे करारनामे येणार आहेत, ते गाळे रेडिरेकनर दराने देण्यात यावे, या स्थायीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांकडून आलेल्या तारांकित मानांकनाचा मुद्दा सभागृहासमक्ष आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांना स्टार रेटिंग द्यायचे आहे. सर्वोच्च सात मानांकनात शहराचे ‘टू स्टार’ मानांकन करण्यात आले आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नगरसेवकांनी जी माहिती भरुन दिली, त्याआधारे प्रशासनाने दोन स्टार मानांकन ठरविल्याची माहिती आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली. तथापि, बहुतांश नगरसेवक स्टार रेटिंगबाबत अनभिज्ञ दिसून आले. टू स्टार रेटिंग आपल्याच शहराचा कमीपणा दर्शविणारे आहे; त्यामुळे सर्व नगरसेवकांनी नव्याने स्वच्छतेचे मानांकन निश्चित करावे, असे मत माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी व्यक्त केले. तुषार भारतीय, सुनील काळे, प्रशांत वानखडे यांनीही त्याबाबत मत व्यक्त केले. मात्र, नगरसेवकांनी ज्या १२ निकषावर मानांकन ठरवायचे आहे, ते सर्व मुद्दे स्वच्छतेशी निगडित आहेत. त्यामुळे त्या निकषानुसार शहराची सद्यस्थिती कळेल, असे मत बबलू शेखावत, प्रशांत डवरे, चेतन पवार यांनी मांडले.
प्रशांत डवरे बोलत असताना महापौर संजय नरवणे यांनी स्टार मानांकनाबाबतचे स्वयंघोषणापत्र पुढील आमसभेत ठेवण्यात यावे, असे निर्देश दिले. डेंग्यूवर चर्चा करणारच आहोत, तर मानांकनही स्वच्छतेशीच निगडित आहे. त्यामुळे निकषावर चर्चा करण्याची आग्रही मागणी प्रशांत डवरे यांनी लावून धरली. ते बोलत असतानाच अपक्ष प्रकाश बन्सोड यांनी सभा स्थगितीची सूचना केली व क्षणाचाही वेळ न दवडता महापौरांनी सभा स्थगित केली. गोंधळातच राष्टÑगान घेण्यात आले.
सत्ताधारी भाजपला डेंग्यू व अस्वच्छतेबाबत चर्चा करायचीच नव्हती. त्यासाठी सभा स्थगित करण्यात आल्याचा आरोप बबलू शेखावत, विलास इंगोले, चेतन पवार , ऋषी खत्री, प्रशांत डवरे, प्रदीप हिवसे यांनी केला. वेलमध्ये ‘महापौर मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना, सभा स्थगितीआड त्या लोकहितवादी प्रश्नावर चर्चा होऊ न शकल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र निदर्शने केली तसेच सत्ताधीशांच्या एककल्ली कारभाराचा निषेध केला.
सभागृहात डेंग्यू ‘हाय-हाय’चे नारे
स्टार रेटिंगच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अचानक सभा स्थगित केल्याची घोषणा महापौरांकडून झाल्याने विरोधी बाकांवरील सदस्य चांगलेच संतापले. राष्ट्रगान झाल्यानंतर डेंग्यूवर सत्ताधाऱ्यांना चर्चा करायची नव्हती, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर सभागृहातून बाहेर पडताना बसप गटनेता चेतन पवार यांनी ‘डेंग्यू हाय हाय’चे नारे दिले. शहरातून डेंग्यू हद्दपार झालाच पाहिजे, अशी घोषणा त्यांनी केली. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रशांत डवरे, प्रशांत वानखडे, भारत चौधरी, सुमती ढोके, ऋषी खत्री, अब्दुल नाजिम आदींनीही डेंग्यूबाबत नारेबाजी करीत सत्ताधीश व प्रशासनाचा निषेध केला.
सत्ताधीशांना विचारला जाब
सभा आकस्मिक स्थगित करण्यात आल्याने डेंग्यूवर चर्चा टळली. शहरात डेंग्यूने हाहाकार माजविला असताना, चर्चा आवश्यक होती, असे मत चेतन पवार, बबलू शेखावत, ऋषी खत्री, विलास इंगोले यांनी व्यक्त केले. त्यांनी याबाबत माजी महापौर मिलिंद चिमोटे, सभागृहनेता सुनील काळे, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. प्रशांत डवरे हे यावेळी चांगलेच आक्रमक होते. त्यांनी डेंग्यू लिहिलेला कागद सभागृहात दाखविला.
२४ सप्टेंबर रोजी बैठक
डेंग्यूवर मंगळवारी चर्चा न झाल्याने २४ सप्टेंबर रोजी त्याबाबत गटनेत्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. महापौर संजय नरवणे यांनी मंगळवारी आयुक्तांना तसे पत्र दिले.

Web Title: Drugs 'Dengue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.