इंडो पब्लिक स्कूल परिसराचे आॅडिट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:30 AM2018-06-08T01:30:01+5:302018-06-08T01:30:01+5:30

जंगलाशेजारी असणाऱ्या इंडो पब्लिक स्कूल परिसरात बिबटांंचा वावर असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच खळबळ माजली. वनविभाग या संबंधाने शाळेला सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी पत्र देणार असून, जंगलालगत असणाऱ्या परिसराचे आॅडिटच करणार आहे.

Audit of Indo Public School area | इंडो पब्लिक स्कूल परिसराचे आॅडिट करणार

इंडो पब्लिक स्कूल परिसराचे आॅडिट करणार

Next
ठळक मुद्देवनविभाग अलर्ट : सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी शाळेला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जंगलाशेजारी असणाऱ्या इंडो पब्लिक स्कूल परिसरात बिबटांंचा वावर असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच खळबळ माजली. वनविभाग या संबंधाने शाळेला सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी पत्र देणार असून, जंगलालगत असणाऱ्या परिसराचे आॅडिटच करणार आहे.
अमरावती शहरालगतच्या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. वाघ, बिबटांसारख्या हिंस्त्र पशूंचा अधिवास जंगलात आहे. अनेकदा हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रहिवासी क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत.
आठवडाभरापूर्वी मार्डी रोडलगतच्या जंगल परिसरातील इंडो पब्लिक स्कूलच्या मागील आवारात मादी बिबटासह तीन छावे आढळून आले. मादी बिबट शाळेच्या आवारातसुद्धा गेली. तिचे छावे कुंपणाच्या पलीकडे होते. त्यांना कुंपण ओलांडता आले असते, तर कदाचित ही मादी बिबट याच परिसरात ठाण मांडून बसली असती, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
बिबट थेट शाळेच्या आवारात पोहोचणे ही बाब गंभीर स्वरूप धारण करणारी ठरू शकते. शिकारीच्या शोधात आलेला बिबट व तेथे वस्ती करून असलेला मानव यांच्यात संघर्ष होण्याचा धोका नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊनच ‘लोकमत’ने जनहितार्थ व शाळकरी मुले, पालक, शिक्षक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वृत्त प्रकाशित केले.
येत्या काही दिवसांत शाळा परिसर मुलांनी गजबजून जाईल. त्यावेळी बिबटाचा वावर कायम राहिल्यास त्यांनाही धोका होऊ शकतो. त्यामुळे ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत वनविभागही आता अलर्ट झाला आहे. शाळकरी मुले व जंगलाशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने ठोस पाऊल उचलले आहे.
दररोज वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असून, सायंकाळनंतर इंडो पब्लिक स्कूल परिसराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. वन्य प्राण्यांपासून सावध राहण्याचा इशारा व सतर्क राहून सुरक्षेसंबंधी उपाययोजनांच्या कामी आता वनविभाग लागला आहे. परिसरातील नागरिकांनीही सजग राहण्याची गरज आहे.
या बाबीची होणार तपासणी
जंगलाशेजारी असणाऱ्या शाळा, महाविद्यालय व रहिवासी क्षेत्राला कशाप्रकारे सुरक्षा प्रदान करता येईल, याविषयी हे आॅडिट केले जाणार आहे. वन्यप्राणी शाळेच्या आवारात शिरू नये यासंबंधी काय काळजी घेता येऊ शकते, सुरक्षेबाबत कुठे कमतरता आहे, शाळेच्या आवाराचे कुंपण किती उंचीचे आहे, वन्यप्राणी रहिवासी क्षेत्रात येण्याची कारणे काय, अशा तांत्रिक बाबी तपासल्या जाणार आहेत.
पत्रात सुरक्षेसंबंधी सूचना
शाळेतील मुले, शिक्षक व पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग इंडो पब्लिक स्कूल प्रशासनाला पत्र देणार आहे. मुले शाळेच्या आवाराबाहेर जाऊ देऊ नका, जंगलाकडून शाळेपर्यंत येणारे मार्ग सुरक्षित करा, कुंपणाची उंची वाढवा, अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट लावा, सायंकाळनंतर बाहेर पडू नका आदी सुरक्षेसंबंधी सूचनांचे पत्र शाळा व्यवस्थापनाला दिले जाणार आहे.

Web Title: Audit of Indo Public School area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.