विषाणूजन्य आजाराने अमरावतीकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:40 PM2018-07-10T22:40:47+5:302018-07-10T22:42:21+5:30

पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Amravatiikar Bazar with viral illness | विषाणूजन्य आजाराने अमरावतीकर बेजार

विषाणूजन्य आजाराने अमरावतीकर बेजार

Next
ठळक मुद्देडेंग्यूृ संशयितांची संख्या वाढलीगॅस्ट्रोचीही लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. त्या सर्व संशयितांचे रक्तजलनमुने परिक्षणासाठी रक्तजलनमुने यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होताच डेंग्यूसह अन्य आजारांनी डोके वर काढले आहे.
१ ते १० जुुलैदरम्यान शहरातील विविध खासगी रुग्णांलायत डेंग्यूसदृश रुग्ण उपचारार्थ दाखल असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या संशयित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आलेत. शहरातील त्या परिसरात महापालिकेतर्फे उपाययोजना राबविल्या जात आहेत. महालक्ष्मीनगर, दस्तुरनगर, अकोली रोड, बडनेरा, चैतन्य कॉलनी, चक्रधरनगर, गाडगेनगर, दत्ता कॉलनी या भागात हे डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. त्या भागातील रुग्णांच्या घरांसह अन्य परिसराची तपासणी केली असता अनेक घरातील कुलर, पाण्याचे हौद आणि झाडांच्या कुंड्यांमध्ये असलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्याचे हौद खाली करण्यास सांगितले असता अनेक जण नकार देत असल्याची वस्तुस्थितीही लक्षात आली आहे. दरम्यान अजय डफळे, मनोज निचत, सचिन काळे, राजेंद्र ढोरे, अमोल अवघड, भुपेश भोंड या डॉक्टरांसह दयासागर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले आहेत.
2801जणांना गॅस्ट्रो
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात २८०१ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली. अतिसाराचेही ५२ रुग्ण आढळले, तर ८ रुग्णांना डिसेंट्री, १५ जणांना कावीळ, तर ७६ रुग्णांना विषमज्वराची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सहा महिन्यांत शहरात कॉलराची कुणालाही लागण झाली नाही.
अशी घ्यावी खबरदारी
थंडी वाजून ताप भरणे, मोठ्या प्रमाणात अंगदुखी आणि अंगावर लालसर रंगाचे चट्टे दिसत असल्यास ती डेंग्यू तापाची लक्षणे असू शकतात. डेंग्यूमध्ये पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचे डास साठलेल्या पाण्यात होत असल्याने घरात किंवा घराच्या आवारात पाणी साठणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. श्वासाचे आजार, ताप, सर्दी, खोकला यांच्यापासून बचाव करण्यासाठी आजाराची लक्षणे दिसल्यास पुरेशी विश्रांती घ्या. पावसात भिजणे टाळा. कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाणी पिणे हे उपाय करा. अशुद्ध पाणी प्यायल्याने होणारे पोटाचे विकार, उलटया, जुलाब टाळण्यासाठी फिल्टरचा वापर करा. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. पाण्यामार्गे पसरणारे आजार गंभीर असल्याने औषध विके्रत्यांकडून परस्पर औषधी न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Amravatiikar Bazar with viral illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.