३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

By गणेश वासनिक | Published: March 28, 2024 11:19 PM2024-03-28T23:19:47+5:302024-03-28T23:20:22+5:30

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी झाल्या ताज्या; शिवसेनेचा मुंबईनंतर अमरावतीत विस्तारावर भर, गाव-खेड्यात शाखांचे जाळे

After 33 years, Shiv Sena will not have a candidate in Amravati Lok Sabha; Remembered Balasaheb | ३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

अमरावती: अमरावती जिल्हा आणि शिवसेना हे फार जुनी नाते आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आजोळ हे अचलपूर होते. त्यांनी अचलपुरात बालपणदेखील घालविले आहे. त्यामुळे शिवसेनेची मुंबईत स्थापना झाल्यानंतर अमरावतीत मोठ्या प्रमाणात शाखा स्थापन करून विस्तार त्यांनी केला होता. १९९१ ते २०१९ या दरम्यान अमरावती लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार रिंगणात होता. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून शिवसेनेचा उमेदवार नाही, हे वास्तव आहे.

राज्यात १९९५ मध्ये भाजप-सेना युती झाल्यानंतर अमरावती लाेकसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. १९९९ पर्यंत सलग सेनेचा उमेदवार अमरावतीच्या रिंगणात कायम होता. मात्र खासदार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा १९९९ मध्ये पराभव केला. त्यानंतर राज्यात शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने उद्वव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेना फोडली. भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झालेत. आमदार-खासदारांना उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे केले आणि आता धनुष्यबाण,शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाने सोपविला आहे. राजकीय परिस्थिती बदलताच भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघ आपल्या तंबूत खेचला असून, अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित केली आहे. तूर्तास काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. भाजप-सेना युतीमध्ये अमरावती लोकसभा मतदार संघ हा परंपरागत शिवसेनेच्या वाट्याला यायचा. मात्र यंदा पहिल्यांदाच अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून शिवसेना हे नाव बाद झाल्याबाबतचे शल्य जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्यांना बनवले आमदार, खासदार

मुंबईत शिवसेनेची पायेमुळे रोवली जात असताना बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्ताराला प्राधान्य दिले.
कोणताही राजकीय लवलेश नसलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना खासदार, आमदार बनविले. ही जादू केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या
शिवसेनेत अनुभवता आली. १९९५ मध्ये ज्ञानेश्वर धाने पाटील (बडनेरा), प्रकाश भारसाकडे (दर्यापूर), संजय बंड (वलगाव)
विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. तर १९९१ ते २००९ या कालावधीत अनंत गुढे तर २००९
ते २०१४ या दरम्यान आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे खासदार होते.

ठाकरे कुटुंबीयांचे अमरावतीशी जवळीक

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांची अमरावतीशी फार जवळीक आहे. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे हे अमरावतीत प्रचारसभेसाठी याचचे. येथील सायन्सस्कोर मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळ्या शैलीतील भाषण जणू शिवसैनिकांसाठी प्रबोधन ठरत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अमरावतीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा गाजवल्या आहेत.

Web Title: After 33 years, Shiv Sena will not have a candidate in Amravati Lok Sabha; Remembered Balasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.