राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 04:30 PM2018-01-08T16:30:28+5:302018-01-08T16:31:19+5:30

शेतक-यांना दर १० मिनिटाला हवामानाच्या अचूक माहिती मिळण्याकरिता राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली.

2065 automatic weather centers in the state are ineligible | राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे कुचकामी

राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे कुचकामी

googlenewsNext

गजानन मोहोड
अमरावती : शेतक-यांना दर १० मिनिटाला हवामानाच्या अचूक माहिती मिळण्याकरिता राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी अद्याप एकाही केंद्रावरून शेतक-यांना हवामान माहितीचा एसएमएस पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हवामानातील बदलांमुळे शेतक-यांना कायम नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये पिकांच्या नासाडीतून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१७ मध्ये हवामानाच्या अचूक माहितीचा वेध घेण्यासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या माध्यमातून राज्यातील सर्व २,०६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. या केंद्रांमुळे शेतक-यांना पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वा-याचा वेग आणि दिशा या घटकांसह १२ किमी परिघातील हवामानाची अचूक माहिती दर १० मिनिटांनी एसएमएसद्वारे मिळणार आहे.

यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत कृषी विभागाचा सात वर्षांसाठी करारदेखील झाला. जागेव्यतिरिक्त या प्रकल्पात शासनाची कोणतीही आर्थिक गुंतवणूक नाही. कृषी विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विजय कुमार यांच्या पुढाकारामुळे शासनाची किमान १५० कोटींची बचत झाली. राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१७ ला उद्घाटन झाले. त्यानंतर राज्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये ही केंद्रे उभारण्यात आली. यामधून डेटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येतो.

मात्र राज्य प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मुहूर्त न गवसल्याने योजना कितीही महत्त्वाची असली तरी अंमलबजावणी सहा महिन्यांपासून अद्याप सुरू झालेली नाही. येत्या २६ जानेवारीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन असल्याची माहिती कंपनीचे विदर्भ व्यवस्थापक भूषण रिनके यांनी सांगितले.

सर्वाधिक केंद्र पुणे व यवतमाळ जिल्ह्यात
महावेध प्रकल्पांतर्गत २०६५ केंद्रे राज्यात उभारण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १०१ केंद्रे यवतमाळ व १०० पुणे जिल्ह्यात आहेत. सोलापूर ९१, नाशिक ९२, बुलडाणा ९०, सातारा ९१, अहमदनगर ९७, गडचिरोली ४०, चंद्रपूर ५०, गोंदिया २५, वर्धा ४७ व अमरावती जिल्ह्यात ८९ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. याव्यतिरिक्त दुर्गम व डोंगराळ भागातही केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी शेतक-यांना माहिती मिळत नसल्याने ती कुचकामी ठरली आहेत.

दर १० मिनिटांनी डेटा लॉगरला
सर्व महसूल मंडळांतील केंद्रांद्वारी दर १० मिनिटांनी हवामान घटकांचा डेटा लॉगरला मिळणार आहे. ही माहिती पुढे दर तासाला पुणे येथील सर्व्हरला पाठविली जाणार आहे. ही माहिती पीक विम्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, यासाठी विमा कंपन्यांना स्कायमेटकडून माहिती खरेदी करावी लागेल. यासाठीदेखील कंपनीला ३,२५० रुपये दरमहापेक्षा जास्त दराने माहिती विकता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे.

Web Title: 2065 automatic weather centers in the state are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.