ठळक मुद्देविभागीय आढावा बैठक मृद व जलसंधारण मंत्र्यांनी दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मागील दोन वर्षांतील अमरावती विभागातील कामे गुणवत्तापूर्णपणे ३१ मार्च २0१८ पूर्वी पूर्ण करावीत. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित यंत्रणांचे प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी  देत चालू २0१७-१८ वर्षातील कामे जून-२0१८ पर्यंत पूर्ण करावीत, अशी स्पष्ट सूचना मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात अमरावती विभागातील जलयुक्त शिवार अभियानाच्या तीन वर्षांतील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमित झनक, आमदार बळीराम सिरस्कार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष  संध्या वाघोडे, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमा पाटील, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदींसह विभागातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, की यावर्षी कमी झालेल्या पावसाची झळ केवळ जलयुक्त अभियानात गेल्या तीन वर्षांतील कामांमुळे कमी होणार आहे. अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे; परंतु प्रशासकीय अडचणींमुळे पहिल्या वर्षी सुरू झालेली कामे रेंगाळलेली आहेत. या तीनही वर्षांतील कामांचा प्रकल्प अहवाल १५ नोव्हेंबरपूर्वी विभागीय आयुक्त यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवावा, विभागात झालेल्या कमी पावसामुळे आज जलयुक्तची गरज निर्माण झाली तातडीने कामे पूर्ण करावीत. विभागातील वाशिम जिल्हय़ात जलयुक्तची कामे उत्कृष्टपणे पूर्ण झाल्याबद्दल प्रा. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. 
आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा परिषदेची यंत्रण जलयुक्तची कामे करण्यास फारशी उत्सुक दिसत नसल्याचे स्पष्ट करीत या यंत्रणेवर रोष व्यक्त करीत बंधार्‍यांच्या काही कामांची शिफारस केली. आमदार हरीश पिंपळे व आमदार अमित झनक जलयुक्त योजनेच्या कामांमध्ये होणार्‍या दिरंगाईवर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली.  प्रास्ताविक विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. आभार अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मानले. 

आमदाराच्या पत्राला उत्तर न देणार्‍या अभियंत्यांच्या चौकशीचे निर्देश 
मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे यांच्या पत्राला उत्तर न देणार्‍या लघु सिंचनच्या अभियंत्यांची चौकशी करण्याचे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना दिले. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा  अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेत असताना, यासंदर्भात आमदार पिंपळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मालेगाव तालुक्यातील एका धरणाचे काम ९0 टक्के झाले असून, उर्वरीत १0 टक्के काम अपूर्ण का राहिले, यासंदर्भात आमदार हरिष पिंपळे यांनी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला होता. मात्र, या पत्राची दखल संबंधित अभियंत्यांकडून घेण्यात आली नाही, अशी तक्रार आमदार पिंपळे यांनी आढावा बैठकीत केली. 
यावर संबंधित अभियंत्यांची चौकशी करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, असे निर्देश ना. शिंदे यांनी विभागीय आयुक्तांना दिले. मालेगाव तालुक्यातील या धरणासाठी काही शेतकर्‍यांनी जमिन देण्याला विरोध केल्याने उर्वरीत १0 टक्के काम अपूर्ण राहिले, असे स्पष्टीकरण यावेळी जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आले. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न निकाली काढला जाईल, असे जिल्हा परिषदेतर्फे सांगण्यात आले.