खारपाणपट्ट्यातील गावे तहानलेली; शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:30 PM2019-01-11T12:30:56+5:302019-01-11T12:31:49+5:30

अकोला: खारपाणपट्ट्यातील ६४ गावे तहानलेली असून, महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि.प. प्रशासनाने एक दिवसआड पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा २२ जानेवारी रोजी उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

villages are thirsty; Shivsena give warning of agitation | खारपाणपट्ट्यातील गावे तहानलेली; शिवसेनेचा एल्गार

खारपाणपट्ट्यातील गावे तहानलेली; शिवसेनेचा एल्गार

Next

अकोला: महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना चक्क १८ ते २० दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी, खारपाणपट्ट्यातील ६४ गावे तहानलेली असून, महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि.प. प्रशासनाने एक दिवसआड पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा २२ जानेवारी रोजी उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आज रोजी महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. तरीसुद्धा संबंधित गावांना तब्बल १८ ते २० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. मागील २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेल्या सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाला अद्याप ही योजना सुरळीत करता आली नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सांगितले. पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना तीन-तीन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. सत्ताधारी भारिपने व जि.प. प्रशासनाने ६४ गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू न केल्यास शिवसेनेच्यावतीने सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात २२ जानेवारी रोजी उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’ केला जाणार असल्याचा इशारा यावेळी नितीन देशमुख यांनी दिला. पत्रकार परिषदेला माजी आ. गजानन दाळू गुरुजी, मा. जिल्हाप्रमुख विजय मालोकार, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, शहर प्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, विकास पागृत, डॉ. विनीत हिंगणकर, प्रदीप गुरुखुद्दे, सहसंपर्क संघटिका ज्योत्स्ना चोरे, जिल्हा संघटिका प्रा. माया म्हैसने, देवश्री ठाकरे, रेखा राऊत, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, बळीराम कपले, नीलिमा तिजारे, शहर संघटिका राजेश्वरी शर्मा, वर्षा पिसोळे, सुनीता श्रीवास, शुभांगी किनगे, संगीता मराठे, सीमा मोकळकार, दिनेश सरोदे, अभिषेक खरसाडे, केदार खरे, अविनाश मोरे, तरुण बगेरे, अर्जुन गावंडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदन देऊनही दखल नाही!
खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी सातत्याने उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी लावून धरली आहे. याविषयी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ यांना अनेकदा निवेदन दिले. संबंधितांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्यामुळेच शिवसेनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर व नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: villages are thirsty; Shivsena give warning of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.