वंचित बहुजन आघाडी : नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:28 PM2019-03-15T13:28:49+5:302019-03-15T13:28:54+5:30

आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही.

Vanchit Bahujan Aaghadi: Using New Social Engineering | वंचित बहुजन आघाडी : नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग

वंचित बहुजन आघाडी : नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग

Next

- राजेश शेगोकार

अकोला : अलीकडच्या राजकारणात 'सोशल इंजिनिअरिंग' हा परवलीचा शब्द झाला आहे; मात्र महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात याच 'सोशल इंजिनिअरिंग'च्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी. याच प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात 'अकोला पॅटर्न' या नावाने झाली. १९९० ते २००४ पर्यंत याच अकोला 'पॅटर्न'ने आपला सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. या अकोला पॅटर्नचे राजकीय नाव होते 'भारिप-बहुजन महासंघ' आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही. वंचित बहुजन आघाडी या नावाने भारिप-बमसंचा पुढचा राजकीय प्रवास असेल, अशी घोषणाच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे राजकीय पटलावरून भारिप-बमसंची ओळख मिटली जाणार आहे.
१८८४ ला भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोल्यात राजकीय कारकीर्द सुरू केली. अकोल्यात मराठा समाजाचे असलेले प्राबल्य, शिवसेनेचा अकोल्यात सुरू झालेला झंझावात, या पृष्ठभूमीवर मखराम पवार यांना सोबत घेऊन त्यांनी बहुजन महासंघ स्थापन केला. १९९३ च्या नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत भीमराव केराम हे आमदार झाले व पुढे भारिप-बमसं हे समीकरणच झाले. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांना लंकेश्वर गुरुजी, बी.आर. शिरसाट, दिलीप तायडे, प्राचार्य सुभाष पटनायक असे कार्यकर्ते मिळालेत. या कार्यकर्त्यांनी ही चळवळ आणि पक्ष तळागाळात रुजवला अन् मोठाही केला. १९८९ ते १९९६ या तीन लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या पक्षाला मात्र अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश अनुभवता आले. स्वत: बाळासाहेब १९९७ आणि ९८ असे दोन वेळा खासदार म्हणून विजयी झालेत. तर डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे अशांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कारांना आमदार म्हणून मिरवता आले. श्रावण इंगळे, बालमुकुंद, भिरड, साबिया अंजूम सौदागर, पुष्पा इंगळे, शरद गवई, संध्या वाघोडे यांच्यासारख्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपभोगता आले. तर अकोल्याबाहेर भीमराव केराम यांच्यासह, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी असे आमदारही त्यांनी निवडून आणले. या पृष्ठभूमीवर जून २०१८ मध्ये त्यांनी पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीची घोषणा करून नव्या राजकीय डावाला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या पराभवात निर्णायक ठरणारी मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीकडे वळविण्यासाठी आता त्यांनी एमआयएमचीही साथ घेतली असून, भविष्यातील राजकारण हे याच आघाडीच्या माध्यमातून होणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे भारिप-बमसं हा परवलीचा शब्द आता राजकीय पटलावरून पुसल्या जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा राजकीय डाव फसला तर बाळासाहेबांचा आणखी एक प्रयोग, अशी राजकारणात नोंद होईल; मात्र तो यशस्वी झाला तर नव्या पर्वाची सुरुवात होईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे वंचित बहुजन आघाडीच्या भविष्याचा निर्णय करणारे असतील एवढे निश्चित.

 

Web Title: Vanchit Bahujan Aaghadi: Using New Social Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.