सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : न्यू तापडियानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारून तीन बड्या सट्टा माफियांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाइल व लॅपटॉपमधील तपासणीत तब्बल १0 कोटींच्यावर बेटिंग या तिघांकडे लावल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. १५ मोबाइलच्या तपासणीत त्यांचे पाच एजंट सातत्याने कार्यरत असल्याचेही समोर आले असल्याने यामध्ये आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याची माहिती आहे.
भारत-पाकिस्तान या दोन संघामध्ये रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम सामना खेळल्या गेला. या सामन्यावर देशभर मोठय़ा प्रमाणात सट्टा लावण्यात आला असून, अकोल्यातही कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. न्यू तापडियानगरात पवन वाटिकेमध्ये बोरगाव खुर्दच्या सरपंच पती श्यामकुमार नरेशकुमार हेडा (४८), कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल (३४) रा. गुलजारपुरा, ललित देवीदास सुरेखा (५५) रा. जुना भाजी बाजार या तीन मोठय़ा सट्टाबाजांनी मोठय़ा प्रमाणात बेटिंग सुरू केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे याना मिळाली.
त्यांनी पवन वाटिकेत छापा टाकून तीनही सट्टा माफियांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाइलसह लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी पाच एजंटमार्फत तब्बल १0 कोटी रुपयांच्यावर बेटिंग केल्याची माहिती उजेडात आली आहे. शहरात या तीन मोठय़ा सट्टा माफियांचे एजंट केवळ सट्टा घेण्यासाठी कार्यरत होते, हा आकडा १0 कोटींच्याही प्रचंड वर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १0 कोटी रुपयांच्यावर बेटिंग लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी तपासात मोठे मासे आणि हा आकडा प्रचंड फुगणार एवढे निश्‍चित.

एजंटचे कोल्हापूर, धुळे कनेक्शन
पवन वाटिकेतून अटक केलेल्या तीन मोठय़ा सट्टा माफियांच्या संपर्कात अकोल्यातील तीन एजंट आणि कोल्हापूर व धुळे येथील प्रत्येकी एक एजंट संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आले आहे.
कोल्हापूर, धुळे येथील अनेकांनी या तिघांकडे मोठा सट्टा लावला होता. यासोबतच संपूर्ण राज्यात या तिघांचे एजंट कार्यरत होते, या दिशेने तपास करण्यात येत आहे.

बडे माफिया अडकणार!
अकोल्यातील मोठ-मोठय़ा आलिशान निवासस्थानांमध्ये राहणारे बडे सट्टा माफिया यामध्ये अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सखोल आणि सूक्ष्मरीत्या होणार असल्याने यामध्ये मोठय़ा हस्ती असलेल्या माफियांचा पर्दाफाश होणार आहे.