आरोग्यासाठी धावले हजारो अकोलेकर, पहिली 'फिट अकोला' मॅरेथॉन उत्साहात

By Atul.jaiswal | Published: March 10, 2024 11:57 AM2024-03-10T11:57:45+5:302024-03-10T11:58:26+5:30

तरुणांसोबत वरिष्ठांचाही सहभाग, महिलांची संख्या लक्षणीय

Thousands of Akolekars ran for health, first Fit Akola marathon in excitement | आरोग्यासाठी धावले हजारो अकोलेकर, पहिली 'फिट अकोला' मॅरेथॉन उत्साहात

आरोग्यासाठी धावले हजारो अकोलेकर, पहिली 'फिट अकोला' मॅरेथॉन उत्साहात

अकोला  : अकोलेकरांचा प्रचंड उत्साह, प्रतिसाद, तरुणाईचा जल्लोष अशा वातावरणात पहिली 'फिट अकोला मॅरेथॉन' रविवार, १० मार्च रोजी उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासनाकडून लोकसहभागातून आयोजित या मॅरेथॉन'मध्ये सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला. महिला धावपटूंची संख्या लक्षणीय होती.

वसंत देसाई स्टेडियम येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, रेस डायरेक्टर डॉ. राजेंद्रकुमार सोनोने यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट, जसनागरा पब्लिक स्कुलचे सिमरनजीतसिंह नागरा, संचालक अमृता नागरा, जिल्हा अग्रणी बँकेचे नयन सिन्हा, स्टेट बँकेच्या मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

देसाई स्टेडियम येथून दुर्गा चौक, नेहरू पार्क चौक, संत तुकाराम चौक, अशोक वाटिका मार्गे पुन्हा वसंत देसाई क्रीडांगण असा स्पर्धेचा मार्ग होता.
शहरात प्रथमत:च आयोजित होणाऱ्या या २१ किमी लांबीच्या हाफ मॅराथॉनला अकोलेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किमी व 5 किमी या तीन प्रकारांत झाली.

पहाटे चार पासूनच स्पर्धक गोळा व्हायला सुरुवात झाली होती. साडेपाचला प्रारंभ झाला. तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. वरिष्ठ व ज्येष्ठही स्पर्धेत अग्रेसर होते. विद्यार्थिनी व महिलांची संख्याही लक्षणीय होती. दिव्यांग तरुणही सहभागी झाले होते. नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या एका विद्यार्थिनीने सहभाग घेतला. बहुतेक सहभागींनी आपली नियोजित धाव पूर्ण केली.

सहभागींचा हा उत्साह वाखाण्यासारखा आहे. असा उत्साह पाहूनच आम्हाला ऊर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया केतकी माटेगावकर हिने व्यक्त केली.
पर्यटन व नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम घेण्यात आला. भविष्यात ४२ किमी लांबीची पूर्ण मॅराथॉनही आयोजित करण्याचाही मानस आहे, असे जिल्हाधिकारी  अजित कुंभार यांनी सांगितले. चालणे, धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. अकोल्यात यापूर्वी वाकेथॉन आयोजित करण्यात आल्या. हाफ मॅराथॉन प्रथमत:च होत आहे. ही शहरासाठी मोठी उपलब्धी आहे, असे  सोनोने यांनी सांगितले.

सहभागींना इलेक्ट्रॉनिक चिपसह बिब, तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र, टी शर्ट, मेडल देण्यात आले. मार्गावरील चौकांमध्ये ओआरएस, बूस्टरची व्यवस्था करण्यात आली होती. ‘मिलेट इयर’च्या पार्श्वभूमीवर मिलेटपासून तयार केलेल्या अल्पोपहाराची व्यवस्था होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, जसनागरा पब्लिक स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. पेसर शाश्वत कदम, राजेश निस्ताने, नेपाळहून आलेले शेर थारू, अमरेशकुमार, नाईक, केनियाहून आलेले श्री. इसाई यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना गौरविण्यात आले

Web Title: Thousands of Akolekars ran for health, first Fit Akola marathon in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.