शेतक-यांना दहा हजारांच्या कर्ज वाटपाला प्रारंभ!

By admin | Published: June 20, 2017 05:00 AM2017-06-20T05:00:57+5:302017-06-20T05:00:57+5:30

बी-बियाणे, खते खरेदीसाठी दिलासा; पालकमंत्र्यांचा पुढाकार, जिल्हा बँकेची तत्परता.

Ten thousand loans to farmers started! | शेतक-यांना दहा हजारांच्या कर्ज वाटपाला प्रारंभ!

शेतक-यांना दहा हजारांच्या कर्ज वाटपाला प्रारंभ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत शासनाने थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने १0 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत सोमवारपासून तातडीने दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्हा बँकेच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात १0 हजारांचे कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला . शेतकर्‍यांना दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणारी अकोला जिल्हा सहकारी बँक ही पहिली बँक ठरली आहे.
अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेमध्ये पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या कर्ज वाटपचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक के.जी. मावळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ.पाटील यांनी खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने बियाणे, खते खरेदीसाठी रक्कम उपलब्ध होणे आवश्यक होते. शासनाने केलेल्या कर्जमाफी निर्णयातील निकष, बँकांनी सुरू न केलेले कृषी कर्ज वाटपामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. ही बाब लक्षात घेता रविवारी जिल्हा बँक, सहकार खात्याच्या अधिकार्‍यांशी बैठक घेऊन थकबाकीदार शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन केले होते; ते आज प्रत्यक्षात आल्याने कर्ज वाटपाला प्रांरभ झाल्याचे समाधान असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बँकचे अनंत वैद्य यांनी प्रारंभी प्रास्ताविकामध्ये दोन जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये असलेल्या सर्वच शाखामधून कर्ज वाटपासाठी नियोजन केले असल्याची माहिती दिली, तर जिल्हा उपनिबंधक माळवे यांनी कर्ज वाटपासाठी शेतकर्‍यांना कागदपत्रांच्या जाचक अटी नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी तेजराव चतरकर, महादेव गुलाबराव दुतोंडे, अनिल निकामे, पुरुषोत्तम गोंडचवर, राहुल जवंजाळ या शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यात आले.

थकबाकीदार शेतक-यांना मिळणार लाभ
३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना तत्काळ दहा हजारांचे अग्रिम कर्ज मिळणार आहे. जिल्हय़ामध्ये ४४ हजार शेतकरी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे खातेधारक आहेत. यासोबतच इतर राष्ट्रीयीकृत बँकांचेसुद्धा आहेत. जिल्हय़ात जवळपास ७0 हजार थकबाकीदार शेतकरी या निकषामध्ये पात्र ठरत असल्याने अशा शेतकर्‍यांना बँकांकडून तातडीने दहा हजार रुपये कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फक्त स्वयंघोषणा पत्र द्या!
२0१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरीच दहा हजारांच्या तत्काळ कर्जासाठी पात्र ठरणार असल्याने अशा शेतकर्‍यांनी केवळ स्वयंघोषणा पत्राद्वारे संबंधित बँकेकडे कर्जाची मागणी करावयाची आहे. या स्वयंघोषणा पत्रानुसार त्याला कर्जाची रक्कम प्राप्त करता येईल. आणखी कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करण्याची गरज नसल्याचे पालकमंत्री डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले.

तोंडावर आलेली खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेता शेतकर्‍यांना बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी ३0 जून २0१६ रोजीच्या थकबाकीदार प्रत्येक शेतकर्‍याला १0 हजार रुपये देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याचे समाधान आहे. सहकार विभाग व जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीतून तातडीने नियोजन करणे शक्य झाल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.
-डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री

मी अल्पभूधारक शेतकरी आहे. कर्जमाफीची घोषणा झाली मात्र, बी-बियाणे खरेदीसाठी पैसा नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे तातडीने दहा हजारांचे अग्रिम कर्ज मिळाल्यामुळे पेरणीसाठी रक्कम हाती आली आहे. सर्वच शेतकर्‍यांना असे कर्ज तत्काळ मिळावे.
- पुरुषोत्तम गोंडचवर, शेतकरी, खरप

Web Title: Ten thousand loans to farmers started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.