गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेवर अफवांचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:47 PM2018-11-28T14:47:04+5:302018-11-28T14:47:11+5:30

अकोला: रुबेला, गोवर दुहेरी लसीकरणाला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली; पण त्यासोबतच लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना चक्कर आल्याच्या चर्चेमुळे मोहिमेवर अफवांचे सावटही पसरले.

Rumors on the gover, Rubella vaccination campaign | गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेवर अफवांचे सावट

गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेवर अफवांचे सावट

googlenewsNext

अकोला: रुबेला, गोवर दुहेरी लसीकरणाला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली; पण त्यासोबतच लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना चक्कर आल्याच्या चर्चेमुळे मोहिमेवर अफवांचे सावटही पसरले. म्हणूनच महापालिका क्षेत्रातील केवळ ६१ टक्के लसीकरण झाले. सर्वाधिक कमी लसीकरण नायगाव आणि सिंधी कॅम्प परिसरात झाले.
गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी मंगळवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील १८ शाळांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ५ हजार ६८३ विद्यार्थ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. पालकांना आठवण म्हणून सकाळीच घंटा गाड्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे आवाहन करण्यात आले; परंतु विद्यार्थी शाळेत पोहोचेपर्यंत मोहिमेवर अफवांचे सावटही पसरले होते. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पालकांनी लसीकरणाला नकार दिला. अशातच उमरी परिसरातील एका शाळामध्ये ७६९ विद्यार्थ्यांना लसीकरण करून शंभर टक्के लसीकरणाचा टप्पा गाठला. त्यामुळे ही शाळा सर्वांसाठी आदर्श ठरली. परंतु; उर्वरित परिसरातील शाळांमध्ये पालकांवर अफवांचा परिणाम दिसून आला. म्हणूनच बहुतांश पालकांनी पाल्यांना लसीकरणापासून दूर ठेवण्यातच समाधान मानले. मोहिमेच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टापैकी ३ हजार ४५९ विद्यार्थ्यांना गोवर, रुबेला लसीकरण करण्यात आले. एकंदरीत मनपा परिसरात ६१ टक्के लसीकरण झाले. महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील तीन लाख १२ हजार ५१५ मुलांना लस देण्याचे ध्येय आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालये, अंगणवाडी केंद्र, मदरसा आदी वेळापत्रकानुसार उपक्रम राबविण्यात येईल.


उद््घाटन उत्साहात
जठारपेठ स्थित होलीक्रॉस कॉन्व्हेंट येथे मंगळवारी सकाळी गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेचे महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड, डॉ. प्रभाकर मुद्गल यांची उपस्थिती होती, तर जिल्ह्यात मुंडगाव स्थित राधाबाई गणगणे विद्यालय येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते मोहिमेचे उद््घाटन करण्यात आले. आगामी २० दिवस ही लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येईल.

लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना चक्कर
रुबेला, गोवर लसीकरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची शहरात अफवा असताना, जिल्ह्यातील काही भागात विद्यार्थ्यांना चक्कर आल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यातीलच एक घटना कापशी परिसरात घडली. या ठिकाणी एका शाळेमध्ये विद्यार्थिनीला लस दिल्यानंतर ती चक्कर येऊन कोसळली. डॉक्टरांनी तिच्यावर तत्काळ उपचार केला; परंतु असे झाल्यास घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याच प्रकारची घटना शहरातील होलीक्रॉस कॉन्व्हेंटमध्ये घडल्याची चर्चा होती.

पालकांची भूमिका महत्त्वाची
गोवर, रुबेलाची लस घेतल्यावर चक्कर येण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु म्हणून अफवांवर विश्वास ठेवणे चुकीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत उपाशीपोटी पाठवून नये, शिवाय विद्यार्थ्यांच्या मनात लसीकरणाविषयी भीती न पसरवता त्याचे फायदे सांगावे, म्हणजेच विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नसल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

 

गोवर, रुबेला लसीकरणामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नाही. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मोहिमेला प्रतिसाद द्यावा.
- डॉ. एम.एम. राठोड, डीएसओ, जिल्हा परिषद

लसीकरणामुळे बालकांचा आजारांपासून बचाव होईल. शिवाय,भविष्यातील पिढीही आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.
- डॉ. फारुख शेख, आरोग्य अधिकारी, मनपा


लसीकरण संदर्भात शाळेत पालक सभा घेण्यात आली असून, त्यांच्याकडून हमीपत्र भरवून घेण्यात आले. लसीकरणाची कुणावर जबरदस्ती करण्यात आली नाही. शाळेत ५ डिसेंबर रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. त्यावेळी विद्यार्थ्यांना उपाशीपोटी लस दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- माधव मुन्शी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश हायस्कूल

 

Web Title: Rumors on the gover, Rubella vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला