पवित्र पोर्टलवरील बेरोजगार शिक्षकांची नोंदणी आटोपली; आता शिक्षक भरतीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:36 PM2019-02-01T13:36:46+5:302019-02-01T13:37:06+5:30

अकोला: २0१0 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेकडो शाळांमधील पदे रिक्त राहिली. शासनाने ही बंदी मागे घेत, २0 हजार रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला.

Regular registration of unemployed teachers on Pavitra portal; Waiting for recruitment now! | पवित्र पोर्टलवरील बेरोजगार शिक्षकांची नोंदणी आटोपली; आता शिक्षक भरतीची प्रतीक्षा!

पवित्र पोर्टलवरील बेरोजगार शिक्षकांची नोंदणी आटोपली; आता शिक्षक भरतीची प्रतीक्षा!

Next


अकोला: २0१0 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेकडो शाळांमधील पदे रिक्त राहिली. शासनाने ही बंदी मागे घेत, २0 हजार रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी बेरोजगार डीएड, बीएड, एमएड पदवीधारक उमेदवारांनी नोंदणी केली. अंदाजे १ लाख ७१ हजार ३४८ उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली असून, नोंदणीची प्रक्रिया आटोपली आहे; परंतु आता पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
शिक्षक भरती बंद असल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांमधील रिक्त भरण्याची शिक्षण संस्थाचालकांनी सातत्याने मागणी केली; परंतु शिक्षण संस्थाचालकांकडून बेरोजगार उमेदवारांची आर्थिक लूट होते आणि गुणवत्तासुद्धा जोपासली नव्हती. यामुळे शासनाने शिक्षक भरतीला परवानगी दिली नाही. अखेर शासनाने २0१८ मध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठवित, शिक्षकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सुरू केली. ही चाचणी उत्तीर्ण करणाऱ्या बेरोजगार शिक्षकांनी पवित्र पोर्टलवरील नोंदणी करण्यास शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली होती. शिक्षकाच्या गुणवत्तेचा विचार करूनच त्याची निवड करण्याचे शासनाने स्पष्ट केले होते; परंतु शासनाच्या शिक्षक भरतीला शिक्षण संस्थाचालकांनी विरोध करीत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने पवित्र पोर्टलला ३१ मेपर्यंत स्थगिती दिली होती. नंतर मात्र संस्थाचालकांना विश्वासात घेऊन शासनाने शिक्षक भरती करावी, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता संस्थाचालकांना विश्वासात घेऊन शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने बिंदुनामावली अद्ययावत करणे, एसईबीसी प्रवर्ग विचारात घेऊन बिंदुनामावली अद्ययावत करणे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पवित्र प्रणालीवरील व्यक्तिगत माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा देणे, संचमान्यतेतील गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती बिंदुनामावलीनुसार पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे; परंतु पवित्र पोर्टलवरील नोंदणी आटोपल्यानंतर शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात भरतीची शक्यता
शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र निवड प्रक्रिया ठरविण्यात आली. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारी महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.


रिक्त पदांची माहिती बिंदुनामावलीनुसार पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याची माहिती देण्यात आली; परंतु त्यात काही बदल झाला. लवकरच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल. त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत.
-प्रकाश मुकुंद
शिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

Web Title: Regular registration of unemployed teachers on Pavitra portal; Waiting for recruitment now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.