‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, बाईक रॅलीद्वारे मतदारांमध्ये जागृती

By Atul.jaiswal | Published: April 2, 2024 03:49 PM2024-04-02T15:49:28+5:302024-04-02T15:49:56+5:30

रॅलीत जिल्हाधिकाऱ्यासह मान्यवरांचा सहभाग, अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'Raise the pride of tricolor, vote for the country', create awareness among voters through bike rally | ‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, बाईक रॅलीद्वारे मतदारांमध्ये जागृती

‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, बाईक रॅलीद्वारे मतदारांमध्ये जागृती

अतुल जयस्वाल, अकोला: ‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, ‘जागरूक मतदार, बळकट लोकशाही’ अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी मंगळवार, २ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते.

मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या संकल्पनेतून ‘स्वीप’अंतर्गत ‘रॅली फॉर डेमोक्रसी’ ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीची सुरूवात झाली. अशोक वाटिका, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक, जिल्हा क्रीडा संकुल चौक, अकोट स्थानक- माणेक टॉकीज, टिळक मार्ग, गांधी मार्ग, पंचायत समिती, पोलीस लॉन अशी जाऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप झाला.

अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोजित रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत विविध मान्यवर, विद्यार्थी, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मतदानाबाबत विविध फलक व घोषणा व पथनाट्याद्वारेही जनजागृती करण्यात आली. ‘मी जागरूक मतदार, मी मतदान करणारच’ असे घोषवाक्य लिहून उभारलेला स्वाक्षरीफलकही लक्षवेधी ठरला. समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांनी संयोजन केले.

Web Title: 'Raise the pride of tricolor, vote for the country', create awareness among voters through bike rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला