लोकमत सखी सन्मान : कर्तृत्ववान महिलाच समाजात परिवर्तन घडवू शकतात! - जितेंद्र पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:19 PM2019-07-16T14:19:15+5:302019-07-16T14:30:13+5:30

लोकमत सखी मंचाने शहरी व ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केले.

Lokmat sakhi Sanman : Women can make a change in society! - Jitendra Papalkar | लोकमत सखी सन्मान : कर्तृत्ववान महिलाच समाजात परिवर्तन घडवू शकतात! - जितेंद्र पापळकर

लोकमत सखी सन्मान : कर्तृत्ववान महिलाच समाजात परिवर्तन घडवू शकतात! - जितेंद्र पापळकर

Next
ठळक मुद्देमहिलांचा लोकमत सखी सन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. निवासी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक आलोक कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.सखी सन्मान सोहळ्यात सोमवारी बहारदार गीत-नृत्याची सखींना मेजवानी अनुभवता आली.

अकोला: सर्वच क्षेत्रात महिला कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवित आहेत. महिला एकत्र आल्या तर समाजात फार मोठा बदल घडून येऊ शकतो. वॉटर कप स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन गावागावांमध्ये बदल घडवून आणला आहे. कर्तृत्ववान महिलाच समाजात परिवर्तन घडवू शकतात. लोकमत सखी मंचाने तर महिलांना संघटित करून मोठे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले आहे. लोकमत सखी मंचाने शहरी व ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केले.


लोकमत सखी मंचाच्यावतीने सोमवारी दुपारी खंडेलवाल भवन येथे आयोजित खंडेलवाल ज्वेलर्स प्रा. लि. प्रस्तुत लोकमत सखी सन्मान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खंडेलवाल ज्वेलर्स प्रा. लि. चे संचालक नितीन खंडेलवाल, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजीवनी बिहाडे, प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रांजली बिरारी-नेवासकर, इंडियन आयडॉल फेम विशाल दाते होते. व्यासपीठावर लोकमतचे निवासी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक आलोक कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, महिलांमध्ये समाज परिवर्तनाची ताकद आहे. त्यामुळे महिलांनी अ‍ॅनिमिया, टोबॅको मुक्ततेसोबत वृक्षारोपणाच्या कार्यात योगदानासाठी पुढे आले पाहिजे. तरच कार्याला गती येऊन परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी अमृता जटाळे यांच्या अभिनव कथ्थक नृत्य कला मंदिरातर्फे शर्वरी देशपांडे व गायत्री पाटील यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. रंगलेल्या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा लोकमत सखी सन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे निवासी संपादक रवी टाले यांनी करताना, महिलांचे विश्व आता चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहिले नाही. काळ बदलला आहे. त्यामुळे महिला सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. चांद्रयान २ मोहिमेचे नेतृत्वसुद्धा दोन महिला करीत आहे. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला संधी देण्यासाठी लोकमत सखी मंच कार्य करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मयूरी खैरनार यांनी केले. रंगतदार व बहारदार कार्यक्रमाला शेकडो सखींची उपस्थिती होती.  
 

महिलांनी रोजगार देणारा व्यवसाय निवडावा- खंडेलवाल
सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिलांचे सशक्तीकरण होत आहे. असे सांगत, खंडेलवाल ज्वेलर्स प्रा. लि. चे संचालक नितीन खंडेलवाल यांनी, सोन्याचा व्यवसाय ९५ टक्के महिलांवर अवलंबून आहे. आमच्या प्रतिष्ठानामध्ये ७0 टक्के महिला कर्मचारी आहेत. भविष्यात नोकºया कमी होणार आहेत. त्यामुळे महिलांनी त्यांच्या मुलामुलींना रोजगाराभिमुख शिक्षण द्यावे. शासनाच्या विविध योजना आहेत. व्यवसाय करता येईल, असे शिक्षण घ्यावे आणि महिलांनी नोकरीपेक्षा रोजगार देणारे उद्योजक बनावे, असे विचार मांडले.
पार्श्वगायिका प्रांजली बिरारी, गायक विशाल दाते यांनी सादर केलेल्या बहारदार गीत-संगीतावर कार्यक्रमात आलेल्या सखींनी नृत्याचा फेर धरला. रेशमाच्या रेघांनी...वाजले की बारा या लावणीवर तर महिला सखींनी बहारदार नृत्य केले. कार्यक्रमात झालेल्या गाण्यांवर ठेका धरण्याचा मोह सखींना आवरत नव्हता. सखींच्या शिट्ट्यांनी सभागृह दणाणून गेले होते.


या कर्तृत्वान महिलांना मिळाला पुरस्कार!
दिमाखदार लोकमत सखी सन्मान पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते माधुरी दाते (क्रीडा), रोशनी पवार (शौर्य), डॉ. ज्योती कोकाटे (आरोग्य), डॉ.अर्जिनबी युसूफ शेख (साहित्य व कला), डॉ. वसुधा विनोद देव (शिक्षण), आरती पालवे (सामाजिक) या सखींचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


मैफल सप्तसुरांची कार्यक्रमाने आणली रंगत
सखी सन्मान सोहळ्यात प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रांजली बिरारी, इंडियन आयडॉल फेम विशाल दाते यांनी सत्यम् शिवम् सुंदरम्, सांज ये गोकुळी सावळी सावळी...मला वेड लागले प्रेमाचे..., गारवा नवा नवा...पिया तु अब आजा...आजकल तेरेमेरे प्यार केले चर्चे है हजार...कहते मुझको हवाहवाई, झालं झिंग झिंग झिंगाट, रेशमाच्या रेघांनी...अशा बहारदार गाण्यांचा नजराणा सादर करण्यात आला.

अभिनव कला मंदिरातर्फे बहारदार गणेश वंदना
सखी सन्मान सोहळ्यात सोमवारी बहारदार गीत-नृत्याची सखींना मेजवानी अनुभवता आली. कार्यक्रमात अभिनव कथ्थक नृत्य कला मंदिराच्यावतीने बहारदार गणेशवंदना सादर करण्यात आली. संचालिका अमृता जटाळे यांच्या मार्गदर्शनात शर्वरी देशपांडे व गायत्री पाटील यांनी गणेश वंदना सादर करून रसिक सखींची मने जिंकून घेतली.
 

 

Web Title: Lokmat sakhi Sanman : Women can make a change in society! - Jitendra Papalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.