Kabaddi academy should be started in Maharashtra - Vijay Jadhav | महाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू  कराव्या - विजय जाधव 
महाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू  कराव्या - विजय जाधव 

ठळक मुद्देकबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांचे मत

नीलिमा शिंगणे-जगड । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू  करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सहकार्य घ्यावे, असे मत कबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत करताना व्यक्त केले.
खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विजय जाधव केळीवेळी (अकोला) येथे आले आहेत. हरयाणाच्या खेळाडूंचे सध्या कबड्डीवर वर्चस्व आहे. उत्तम शारीरिक क्षमता आणि कठोर मेहनत घेण्याची खेळाडूंची तयारी असते. त्याहीपेक्षा शासनाने साई प्रशिक्षण केंद्र आणि कबड्डी अकादमी स्थापन केल्या आहेत. तेथील प्रशिक्षण, क्रीडा सुविधांचा लाभ निश्‍चितच खेळाडूंना होतो, असेही जाधव म्हणाले.
विदर्भ ही कबड्डीची पंढरी आहे. विदर्भाच्या खाणीमध्ये नीळकंठ खानझोडे, प्यारेलाल पवार, देवी सरभरे, अनिल भुते, रामभाऊ पोवार, प्रकाश बोलाखे, वासुदेव नेरकर, गुलाबराव गावंडे, नंदू पाटील, वासुदेव गरवाले, शरद नेवारे, शेखर पाटील, आमिर खान पठाण, मुश्ताक खान, काशीनाथ रिठे असे अनेक हिरे कबड्डीत जन्माला आलेले आहेत. विदर्भात पूर्वी भारतातील ८0 टक्के ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा विदर्भातच व्हायच्या. यवतमाळ, नागपूर, दिग्रस, मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, पांढरकवडा, वर्धा, कारंजा, अकोला येथे सातत्याने स्पर्धांचे यशस्वी आयोजन व्हायचे. आता विदर्भात कबड्डी सामने फारसे होत नाहीत. आयोजन खर्चाचे बजेट हे त्यामागचे कारण आहे, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.
१९५४ ते १९७४ पर्यंत महाराष्ट्राचे कर्णधारपद मुंबईकडे होते. तब्बल २0 वर्षानंतर कोल्हापूरकडे हे कर्णधारपद आणणारे विजय जाधव पहिले खेळाडू ठरले. महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. एलआयसीमधून सेवानवृत्त झाल्यानंतर कोल्हापूरला महालक्ष्मी क्लब आणि श्री शिवाजी उदय मंडळ चालू केले. खेळाडूंना पूर्णवेळ प्रशिक्षण देणे सुरू  केले. अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेत. यामधूनच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त उमा भोसले, मुक्ता चौगुले आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त तथा थायलंड महिला विश्‍वचषक विजेता संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडेगिरी (सध्या दिल्ली दबंग प्रशिक्षक) सारखे कबड्डीचे महारथी घडले. तसेच या संस्थांमधून कबड्डी सोबतच सायकलिंग व कॅरमचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.


Web Title: Kabaddi academy should be started in Maharashtra - Vijay Jadhav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.