शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Published: November 11, 2015 01:52 AM2015-11-11T01:52:31+5:302015-11-11T02:04:13+5:30

२५ हजार ८0१ शेतक-यांनी काढला होता विमा

Farmer waiting for crop insurance! | शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

Next

सायखेड (अकोला): गतवर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी काढलेल्या विम्याचा लाभ जिल्ह्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादन घटले. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पैसा कोठून आणावा आणि संसाराचा गाडा कसा हाकावा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विम्याचा लाभ मिळाला असता तर थोडीशी का होईना विवंचना कमी झाली असती, अशी भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.
गतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांना शासनाच्या आर्थिक मदतीसह खरीप हंगामासाठी काढलेला पीक विमा मिळाला होता. शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी शेती तयार करून मागील दुष्काळाची झीज भरून काढण्यासाठी पेरणी केली; मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा रब्बी पिकांना फटका बसला. पिके काढणीला घेताच वादळी वार्‍यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व इतर पिके भुईसपाट झाली. गतवर्षी रब्बी हंगामात अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांनी रब्बी पीक विमा काढून पिकाला संरक्षण दिले होते.
यंदा जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारल्याने पिके सुकली. त्यानंतर काही ठिकाणी अतवृष्टीही झाली. त्यामुळे उत्पादन प्रचंड घटले.
बहुतांश शेतकर्‍यांचा तर मशागत आणि पेरणीचा खर्चही निघालेला नाही; मात्र आता गतवर्षीचा रब्बी पीक विमा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
शासनाने तातडीने विमा मंजूर होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

Web Title: Farmer waiting for crop insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.