जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन

By Atul.jaiswal | Published: September 29, 2021 12:10 PM2021-09-29T12:10:47+5:302021-09-29T12:14:06+5:30

Akot Rural Hospital : अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मात्र सरसकट सर्वच गरोदर महिलांना अकोला येथे रेफर करतात.

The Civil Surgeon performed three caesareans at Akot Rural Hospital | जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन

जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन

googlenewsNext
ठळक मुद्दे कृतीद्वारे डॉक्टरांना केले प्रोत्साहित रेफरमुळे वाढतो जीएमसी, लेडी हार्डिंगवरचा भार

- अतुल जयस्वाल

अकोला : जिल्हा शल्य चिकित्सक पदाची (सीएस) अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. वंदना वसो - पटोकार यांनी गत नऊ दिवसात अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन तीन गरोदर महिलांची सिझेरियनद्वारे प्रसूती करीत इतर डॉक्टरांना आपल्या कृतीद्वारे प्रोत्साहित केले आहे.

गत दोन महिन्यांपूर्वी सीएस पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर डॉ. वसो यांनी आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाकडे लक्ष घातले आहे. जिल्ह्यात मूर्तिजापूर व अकोट येथील ग्रामीण रुग्णालये ही फर्स्ट रेफरल युनिटचा दर्जा असून, याठिकाणी गरोदर महिलांची सिझेरियन प्रसूती केली जाते. रुग्णाची स्थिती अधिकच बिकट असेल, तरच अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करावे, अशा सूचना आहेत. मूर्तिजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूती व्यवस्थित होत आहेत. अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मात्र सरसकट सर्वच गरोदर महिलांना अकोला येथे रेफर करतात. अकोट शहरातील खासगी डॉक्टरही ग्रामीण रुग्णालयात येऊन सिझेरियन करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनातील भीती घालवावी व त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने डॉ. वंदना वसो यांनी गत नऊ दिवसात ३ सिझेेरियन शस्त्रक्रिया केल्या आहेत. या कामात त्यांना मूर्तिजापूरचे डॉ. राजेंद्र नेमाडे, अधिपरिचारिका सराेज घावट यांचे सहकार्य मिळत आहे.

अकोट रुग्णालयातून रोज एक रेफर

अकोट ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा आहेत. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणे अपेक्षित आहे. तथापी, त्यांच्याकडून सरसकट सर्वच रुग्णांना अकोला येथे रेफर करतात. अकोट येथून दररोज किमान एक गरोदर महिलेस अकोला येथे पाठविले जाते. यामुळे जीएमसी व लेडी हार्डिंग रुग्णालयावर भार वाढतो.

 

सीएस पदावरील डॉक्टरांनी ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया कराव्या, असा प्रोटोकॉल आहे. अकोट येथे सिझेरियन करावयास कोणी डॉक्टर तयार होत नसल्यामुळे मी व माझे मूर्तिजापूर येथील सहकारी डॉक्टरांनी अकोट रुग्णालयात तीन सिझेरियन केले. तेथील डॉक्टर स्वत: सिझेरियन करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे, हा उद्देश आहे.

- डॉ. वंदना वसो - पटोकार, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: The Civil Surgeon performed three caesareans at Akot Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.