ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयचौकशी समितीने केलेल्या पाहणीत कोणीही दोषी आढळून  आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार  रुग्णालयातून रुग्णांचे केस पेपर चोरी गेल्या प्रकरणाची चौकशी  करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने चौकशी पूर्ण  केली असून, यामध्ये कोणीही दोषी आढळून न आल्याने ही  चौकशी गुंडाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, गहाळ गेलेल्या केस पेपरच्या दुय्यम प्रती संगणकात  ‘सेव्ह’ असल्याचे चौकशी समितीकडून सांगण्यात आले.
सवरेपचार रुग्णालयाच्या वार्ड क्र. ९ मधून शुक्रवारी तब्बल ४१  रुग्णांचे केस पेपर गहाळ झाल्याची तक्रार रुग्णालय  प्रशासनाकडून सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली हो ती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रभारी अधिष्ठाता डॉ.  कुसुमाकर घोरपडे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर  अस्वार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती.  यामध्ये डॉ. अभिजित अडगावकर व अधिसेविका ग्रेसी मरियम  यांचा समावेश होता. या चौकशी समितीने केस पेपर चोरी  झाल्याच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांचे जबाब  नोंदविले. यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. हा खोडसाळ पणाचा प्रकार असावा, असे चौकशी समितीचे म्हणणे आहे.  रुग्णालयातील सर्व रुग्णांच्या केस पेपरची संगणकात नोंद केली  जाते. चोरी गेलेल्या केस पेपरच्या दुय्यम प्रती संगणकात ‘सेव्ह’  असल्याने ते गहाळ झाले असले, तरी त्याचा काही परिणाम  होणार नसल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे.