बाळापूर सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप!

By admin | Published: August 30, 2016 02:05 AM2016-08-30T02:05:45+5:302016-08-30T02:05:45+5:30

नातिकोद्दीन खतीबसह १२ जणांविरुद्ध तक्रार : १३ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप.

Balapur co-operative credit society accused of misconduct! | बाळापूर सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप!

बाळापूर सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप!

Next

अकोला, दि. २९:: बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार सुरू असून पतसंस्थेच्या अध्यक्षासह व्यवस्थापक व १२ जणांनी पतसंस्थेत तब्बल १३ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सै. नातिकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत.
बाळापूर येथील रहिवासी युसुफ खा दुले खा आणि अकबर खान मेराज खान या दोन व्यापार्‍यांनी बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार संबंधाची तक्रार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. या तक्रारीनुसार युसुफ खा दुले खा यांनी १४ जुलै २0१५ रोजी ३0 हजार रुपये १३ टक्के व्याजदराने एक वर्षासाठी मुदती ठेवीत जमा केले होते. या जमा ठेवीची पतसंस्थेने युसुफ खा यांना 000५0८८ क्रमांकाची पावतीही दिली. ३0 हजार रुपयांच्या जमा ठेवीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर युसुफ खा यांनी १४ ऑगस्ट २0१६ रोजी ३४ हजार २३५ रुपये रक्कम व्याजासह परत मिळविण्यासाठी बाळापूर नागरी सहकारी पतंसस्थेत अर्ज केला; मात्र पतसंस्थेकडून त्यांना रक्कम न देता टाळाटाळ करण्यात आली. युसुफ खा यांनी रक्कम मिळविण्यासाठी पतसंस्थेत १४ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २३ आणि २६ ऑॅगस्ट रोजी वारंवार निवेदन देऊन पैशाची मागणी केली; मात्र पतसंस्थेने त्यांना पैसे परत न देता अश्लील शिवीगाळ केली. कुठेही तक्रार केली तरी चालेल; पण पैसे परत मिळणार नाही, असा दमही पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालकांनी युसुफ खा यांना भरला. त्यामुळे युसुफ खा यांनी या प्रकरणाची तक्रार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये केली असून या तक्रारीनुसार पतसंस्थेत तब्बल १३ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे.

यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप
हा गैरव्यवहार पतसंस्थेचे अध्यक्ष सै. नातिकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब, उपाध्यक्ष श्याम शेगोकार, व्यवस्थापक फिरोज खान, संचालक अँड. सै. हमीदोद्दीन सै. जमीरोद्दीन, मो. हनीफ अ. मुनाफ, गफ्फारजी रहेमानजी रंगारी, निर्मला श्रीकृष्ण अंबुजी उमाळे, निजामोद्दीन शफीउद्दीन, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, शेख मुनीर शेख कबीर, रजिया बेगम सै. नातिकोद्दीन खतीब, नंदू पंचभाई यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेचे वार्षिक अंकेक्षण योग्य आहे. दरवर्षीच हे अंकेक्षण करण्यात येत असून यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे, बाळापूर येथील दोन सहकारी पतसंस्थांमध्ये घोळ झाल्याचे समोर आल्यानंतर ठेवीदारांनी पैसे परत मागण्यासाठी एकच गर्दी केली. एकाच वेळी सर्वांनी पैसे परत घेण्यासाठी अर्ज केल्याने त्यांना रक्कम देणे शक्य नाही; मात्र तरीही पतसंस्थेने ठेवीदारांना ३ कोटी रुपये दिले असून उर्वरित ठेवीदारांचे ३ कोटी रुपये देण्याचे बाकी आहे. ही रक्कम लवकरच ठेवीदारांना देण्यात येणार आहे. आता बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेकडे ३ कोटी रुपये नागरिकांचे देणे असून कर्जदारांकडून तब्बल ७ कोटी रुपयांची रक्कम वसूल करणे आहे. ही वसुली सुरू होताच ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात येणार आहे.
सै. नातिकोद्दीन खतीब
अध्यक्ष, बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था, बाळापूर

Web Title: Balapur co-operative credit society accused of misconduct!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.