Asia Cup, Ravi Rohit, Akilkar proud of Ako's name in Ranji Trophy! | आशिया कप, रणजी ट्रॉफीमध्ये अकोल्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या रवी, आदित्यचा अकोलेकरांना अभिमान!
आशिया कप, रणजी ट्रॉफीमध्ये अकोल्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या रवी, आदित्यचा अकोलेकरांना अभिमान!

ठळक मुद्देरणजी स्पर्धेत खेळण्याची परंपरा कायम 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील क्रिकेटला फार जुनी परंपरा आहे आणि ही परंपरा टिकविण्यासाठी येथील ज्येष्ठ खेळाडूंचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील ज्येष्ठ क्रिकेट खेळाडूंनी मुलांपासून युवकांपर्यंत क्रिकेटचा खेळ रुजविण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम आशिया कप, रणजी ट्रॉफीसारख्या ख्यातनाम स्पर्धांमध्ये खेळाडूंना कामगिरी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि या संधीचे खेळाडूनी सोनं केले. रणजीमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रशांत गुप्ते यांना अकोल्यातून स्थान मिळाले होते. प्रशांत यांनी चमकदार खेळ करून त्याकाळात रणजीमध्ये अकोल्याचा पाया रचला . ती परंपरा अनेक खेळाडूंनी गेल्या दोन दशकात कायम ठेवली असून यावर्षी गोलंदाज रवी ठाकूर, आदित्य ठाकरे यांनी या यशस्वी परंपरेला पुढे नेत कळस रचला आहे. 
१९२९ मध्ये अकोल्यात क्रिकेट क्लब सुरू झाला. या क्रिकेट क्लबवर त्या काळी ब्रिटिश अधिकारी क्रिकेट खेळत असत. त्यांचा खेळ पाहून अनेक खेळाडूंनी हातात बॅट पकडली आणि क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली; परंतु त्या काळात भाषा, प्रांतवादामुळे अनेक गुणी खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधीच मिळाली नाही. 
१९८0, ९0 च्या काळामध्ये अकोल्यात प्रशांत गुप्ते, आनंद चितळे,  नंदू गोरे, श्याम काशिद, संतोष देशमुख यांनी विदर्भाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याचा मान मिळविला. अकोला क्रिकेट क्लबचे माजी कर्णधार अशोक ढेरे, भरत डिक्कर, अँड. मुन्ना खान, विवेक बिजवे यांनीही अकोल्यात क्रिकेट खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले. रणजी खेळलेल्या नंदू गोरे, संतोष देशमुख यांनीसुद्धा अकोला क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मुलांपासून तरुणांपर्यंत क्रिकेटचे धडे दिले. 
मंगेश कुळकर्णी यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीची चमक दाखविली आणि काव काव क्रिकेट संघाच्या माध्यमातून युवकांमध्ये क्रिकेट रुजविण्याचा प्रयत्न केला. या ज्येष्ठ क्रिकेट खेळाडूंच्या मार्गदर्शनात रवी ठाकूर, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, अथर्व तायडे हे दर्जेदार खेळाडू तयार झाले. रवी ठाकूरने विदर्भ संघातर्फे रणजी ट्रॉफीचे अनेक सामने गाजवले. आता त्याच्याच पाठोपाठ आदित्य ठाकरे यानेसुद्धा रणजी ट्रॉफी स्पर्धेत चमकदार करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. 

भारतीय युवा संघामध्ये तिघे चमकले
मलेशिया येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत १९ वर्षाआतील भारतीय संघामध्ये अकोल्यातील आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, अथर्व तायडे यांनी वर्णी लागली होती. या तिघांनीही संघाचे प्रशिक्षक व महान खेळाडू राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात अष्टपैलू कामगिरी केली होती. 

भारतीय संघात तीन खेळाडूंचा समावेश; देशातील पहिली घटना
देशातील अनेक क्रिकेट क्लबच्या एखाद्या खेळाडूची भारतीय संघात निवड होते; परंतु अकोला क्रिकेट क्लब देशात एकमेव आहे की, या क्लबचे तीन खेळाडू १९ वर्षीय भारतीय संघात निवडले गेले आणि एकाच सामन्यात खेळलेसुद्धा. एका शहराचे तीन खेळाडू भारतीय संघात खेळतात, ही देशातील पहिलीच घटना आहे. 

विदर्भाच्या विजयात आदित्यचा वाटा
इंदूर येथे झालेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना विदर्भाकडून आदित्य ठाकरे याने दोन गडी टिपून गुरबानी याला मोलाची साथ दिली. आदित्यने आशिया स्पर्धेतसुद्धा चमकदार कामगिरी केली होती. त्याचाच फायदा त्याला रणजी ट्रॉफीमध्ये झाला. 

गोलंदाज डेनिस लिली, मॅकग्राचे मार्गदर्शन
मलेशिया येथील आशिया कप स्पर्धेसाठी १९ वर्षीय भारतीय संघामध्ये आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, अथर्व तायडे यांची निवड झाली होती. यावेळी या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि जगातील अव्वल गोलंदाज असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली, ग्लेन मॅकग्रा यांनी गोलंदाजीचे धडे दिले. या मार्गदर्शनाचा लाभ करून घेत, आदित्यने रणजीमध्ये दिल्लीविरुद्ध दोन गडी बाद करून विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. 

मी दोन वर्षांपासून रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत आहे. दोनदा विदर्भ संघ रणजी ट्रॉफीत उपांत्य फेरीत पोहोचला; परंतु विजयाने हुलकावणी दिली. दिल्लीविरुद्ध मिळालेला विजय संस्मरणीय आहे. 
- रवी ठाकूर, गोलंदाज

गत तीन ते चार वर्षांपासून अकोल्यातील क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. भारतीय संघामध्ये अकोल्यातील खेळाडू खेळतील, असे कोणालाही वाटले नसेल. सध्याच्या स्थितीत अकोल्यातील २0 खेळाडू विदर्भाकडून सर्व श्रेणीतील क्रिकेटमध्ये खेळत आहेत. अकोला क्रिकेट क्लबच्या माध्यमातून गुणी खेळाडू घडत आहेत. याचा अभिमान आहे. 
- भरत डिक्कर, कर्णधार, 
अकोला क्रिकेट क्लब.

विदर्भाने रणजी ट्रॉफी जिंकली. याचा आनंद आहे आणि या संघामध्ये अकोला क्रिकेट क्लबने घडविलेले खेळाडू आहेत. याचा अभिमान वाटतो. अकोल्यातील क्रिकेटला उज्ज्वल भवितव्य आहे. आम्ही केलेल्या परिश्रमाला आता फळ येत असल्याचे पाहून, आनंद वाटतो. 
- नंदु गोरे, माजी रणजीपटू.

अनेक वर्षांपासून अकोल्यातील मुले, तरुणांना क्रिकेटचे धडे दिल्या जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून दर्जेदार खेळाडू म्हणून अनेक खेळाडू उदयास येत आहेत. विदर्भाच्या संघात अकोल्यातील दोन खेळाडू, १९ वर्षीय भारतीय संघामध्ये तीन खेळाडूंचा समावेश आहे. यातूनच अकोल्यातील क्रिकेटचा स्तर उंचावला असून, भविष्यात भारतीय संघामध्येसुद्धा आपले खेळाडू खेळताना दिसून येतील. 
- अशोक ढेरे, माजी कर्णधार, अकोला क्रिकेट क्लब.


 


Web Title: Asia Cup, Ravi Rohit, Akilkar proud of Ako's name in Ranji Trophy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.