अकोला : अतिक्रमण विभागातील अधिकार्‍याला अतिक्रमकांचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:45 AM2018-02-01T00:45:51+5:302018-02-01T00:47:02+5:30

अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकार्‍याला व कर्मचार्‍याला गांधी रोडवरील अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याने सिटी कोतवाली पोलिसात दिलेली तक्रार अवघ्या दहा मिनिटांत परत घेतल्याची माहिती आहे.

Akola: The encroachment officer encroached | अकोला : अतिक्रमण विभागातील अधिकार्‍याला अतिक्रमकांचा चोप

अकोला : अतिक्रमण विभागातील अधिकार्‍याला अतिक्रमकांचा चोप

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसात दिलेली तक्रारही घेतली मागेकर्मचार्‍यांचे खच्चीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकार्‍याला व कर्मचार्‍याला गांधी रोडवरील अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याने सिटी कोतवाली पोलिसात दिलेली तक्रार अवघ्या दहा मिनिटांत परत घेतल्याची माहिती आहे. संबंधित अधिकार्‍याच्या कृतीमुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकारामुळे मनपा कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे बोलल्या जात आहे. 
शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांची बजबजपुरी माजली आहे. गांधी रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, गांधी चौक ते मोहम्मद अली मार्ग, गांधी चौक ते तहसील कार्यालय, टिळक रोड यासह सर्वच प्रमुख रस्त्यांवर लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पहावयास मिळते. वाढत्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची आहे. आजरोजी या विभागात अंदाधुंद कारभार निर्माण झाला असून, खुलेआम अतिक्रमकांसोबत ‘सेटिंग’ केली जात आहे. अतिक्रमकांजवळून हप्तेखोरी करणार्‍या काही अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे अतिक्रमकांसोबतच जनमानसात मनपा प्रशासनाचा कवडीचाही धाक उरला नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. या विभागाच्या हप्तेखोरीमुळेच अतिक्रमकांचे मनोबल उंचावल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिक्रमण विभागाकडून गांधी रोडवर मनपाच्या आवारभिंतीलगत रेडीमेड कापड विक्रीची दुकाने थाटणार्‍या अतिक्रमकांना तात्पुरते हुसकावल्या जाते. 
सदर अतिक्रमक त्यांच्या हातगाड्या तहसील रोडवर उभ्या करतात. तास-दोन तास हा खेळ चालल्यानंतर पुन्हा मनपाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमक त्यांचा व्यवसाय उभारत असल्याचे चित्र नित्यनेमाचे झाले आहे. सहा दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍याने मनपाच्या आवारभिंतीलगतच्या अतिक्रमकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता, अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत सदर अधिकारी व कर्मचार्‍याला बदडून काढल्याची घटना घडली. 

कर्मचार्‍यांचे खच्चीकरण
तगड्या मानधनावर कार्यरत अधिकार्‍याने पोलीस तक्रार परत घेतल्यामुळे साहजिकच अतिक्रमकांचे मनोबल उंचावले आहे, तर अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी संबंधित अधिकारी मनपातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सुध्दा अधिनस्थ कर्मचार्‍यांबद्दल दिशाभूल करणारी माहिती पुरवित असल्याचे बोलल्या जात आहे. 

तक्रार परत का घेतली?
अतिक्रमकांनी मनपाच्या एका अधिकार्‍याला एवढा चोप देण्याची ही पहिलीच घटना आहे. अतिक्रमकांनी चोप दिल्यानंतर संबंधित अधिकार्‍याने सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवली खरी पण, अवघ्या दहा ते बारा मिनिटांत ही तक्रार मागे घेतली. ही तक्रार देताना व मागे घेताना मनपा प्रशासनाची परवानगी घेतली होती का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: Akola: The encroachment officer encroached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.