The Advanced Cup organized by the Akola Bar Association from State Level 17 competition | अकोला बार असोसिएशनद्वारा आयोजित अँडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा १७ पासून

ठळक मुद्दे१७ ते २१ जानेवारी या कालावधीत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला बार असोसिएशनद्वारा आयोजित अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा १७ ते २१ जानेवारी या कालावधीत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे होत आहे. स्पर्धेतील सामने दिवस-रात्र (फ्लडलाइट) होतील, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ तथा क्रिकेटपटू अँड.  मुन्ना खान यांनी दिली.
अकोला बार असोसिएशनच्या नवीन सभागृहात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत स्पर्धा आयोजनाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वकिलांचे २२ ते २४ संघ सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सामने सायंकाळी ५ वाजतापासून रात्री १0.३0 पर्यंत खेळण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक अँड. मोहनराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ४१,000 व ट्रॉफी, द्वितीय पुरस्कार अँड.  शंकर ढोले यांच्यातर्फे २१,000 व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस १५,000 व ट्रॉफी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर व इतर वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेनिमित्त वकीलवर्ग पहिल्यांदा फ्लडलाइट खेळणार आहे. तसेच अकोल्यात पहिल्यांदा वकिलांसाठी फ्लडलाइट क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले असल्याचेही अँड.  खान यांनी सांगितले.
 स्पर्धेत सहभागी खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांनी केली आहे. स्पर्धेच्या पूर्वसंध्येला १६ जानेवारी रोजी न्यायाधीश संघ व ज्येष्ठ विधिज्ञ संघ यांच्यात प्रदर्शन सामन्याचे आयोजन केले आहे. स्पर्धा आयोजन समितीमध्ये मार्गदर्शक अँड. बी.के. गांधी, अँड.  मुन्ना खान यांच्यासह अजय गोडे, इलियास शेखानी, पवन बाजारे, संतोष वाघमारे, शंकर ढोले, राहुल टोबरे, राहुल वानखडे, हरीश गोतमारे, विनय आठवले, भूषण जोशी आदींचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ विधिज्ञ बी.के. गांधी, अजय गोडे, इलियास शेखानी, सुमित बजाज, प्रवीण तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणुकीचा चढणार रंग
स्पर्धेनंतर लगेच २४ जानेवारी रोजी अकोला बार असोसिएशनची निवडणूक आहे, त्यानंतर महाराष्ट्र अँण्ड गोवा बार असोसिएशनची निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकीमुळे या स्पर्धेला वेगळीच रंगत चढणार आहे.